डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयात एआय विषयावरील एफ.डी.पी. कार्यक्रम संपन्न

जळगाव (प्रतिनिधी): येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय येथे अध्ययन, अध्यापन व संशोधनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या विषयावर प्राध्यापकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफ.डी.पी.) नुकताच उत्साहात संपन्न झाला. उच्च शिक्षणातील गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी आणि शैक्षणिक प्रक्रियेत एआयचा प्रभावी वापर करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आयआयटी कानपूर येथून एम.टेक. शिक्षण घेतलेले सॉफ्टवेअर इंजिनिअर वैभव जे. चौधरी उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे होते. प्रास्ताविकात डॉ. आर. जी. बावने यांनी एआयच्या माध्यमातून अध्ययन-अध्यापन अधिक परिणामकारक करण्याची गरज अधोरेखित केली.
उद्घाटन सत्रात वैभव चौधरी यांनी डिजिटल परिवर्तनाच्या युगात एआयचे वाढते महत्त्व स्पष्ट करताना नैतिकतेसह सजग वापर करण्याचे आवाहन केले. प्रथम सत्रात भुसावळ येथील प्राचार्य डॉ. बी. एच. बऱ्हाटे यांनी शिक्षकांसाठी एआय तंत्रज्ञानाची उपयुक्तता सांगत OpenAI विकसित ChatGPT, तसेच Google ची Google Gemini व NotebookLM यांसारख्या साधनांची माहिती दिली.
द्वितीय सत्रात इलेक्ट्रोसॉफ्ट सिस्टिमचे निलेश वाघ व रश्मी वानखेडे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे एआयचा शैक्षणिक क्षेत्रातील वापर कसा करावा याचे संगणकाद्वारे प्रशिक्षण दिले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. नारखेडे यांनी शिक्षणतज्ज्ञ व उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञांचा सुंदर संगम या कार्यक्रमात दिसून आल्याचे सांगत एआयचा उपयोग केवळ शिक्षणापुरता मर्यादित नसून इतर क्षेत्रातही होऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला.
हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, रिसर्च कमिटी व संगणक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ. प्रशांत पाटील यांनी केले.



