‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२६’ विषयावर मूळजी जेठा महाविद्यालयात विशेष चर्चासत्र

जळगाव (प्रतिनिधी) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त), करिअर कट्टा आणि वाणिज्य व व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२६’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. अर्थसंकल्पातील विविध तरतुदी आणि त्यांचे सर्वसामान्य नागरिक तसेच औद्योगिक क्षेत्रावर होणारे परिणाम यावर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केसीई सोसायटीच्या शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. चर्चासत्रात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले.
शिक्षण व कौशल्य विकास या सत्रात सीए हितेश आगीवाल आणि वित्त कौशल्य विकास प्रशिक्षक रोहित मिश्रा यांनी कौशल्य विकासासाठी जाहीर करण्यात आलेल्या नव्या योजना तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींवर प्रकाश टाकला.
बँकिंग व वित्त विषयावर स्नेहल फासे (रिलेशन बँकिंग हेड, एचडीएफसी बँक) आणि शुभश्री दफ्तरी (मुख्य व्यवस्थापक, जळगाव पीपल्स बँक) यांनी बचत गट, बँकिंग क्षेत्रातील धोरणात्मक बदल आणि कर्जविषयक बाबींवर भाष्य केले.
उद्योग व व्यापार या अंगाने उदय पोतदार (संचालक, पातोंडकर ज्वेलर्स) यांनी सुवर्ण बाजारपेठेतील चढ-उतार आणि उद्योग क्षेत्रासमोरील आव्हाने यांची मांडणी केली.
अकादमिक विश्लेषण सत्रात प्रा. डॉ. मधुलिका सोनावणे (संचालक, व्यवस्थापन प्रशाला, कबचौ उमवि) आणि राहुल पटेल (शैक्षणिक अधिष्ठाता, केसीई अभियांत्रिकी महाविद्यालय) यांनी अर्थसंकल्पाचे तांत्रिक विश्लेषण सादर केले.
चर्चासत्रात कौशल्य विकास, प्राप्तिकर रचनेतील बदल आणि त्याचा मध्यमवर्गावर होणारा परिणाम, कृषी व पायाभूत सुविधांसाठीच्या तरतुदी, महिला सक्षमीकरण व लघुउद्योगांना मिळणारे प्रोत्साहन या प्रमुख मुद्द्यांवर ऊहापोह करण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून तज्ज्ञांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोपीचंद धनगर यांनी केले, तर चर्चेचे समन्वयन डॉ. शमा सराफ यांनी केले. समन्वयक डॉ. निशांत घुगे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. सुरेखा पालवे, अधिष्ठाता सीए अब्दुल आरसिवाला, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. दिलवीरसिंग वसावे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयेश पाडवी यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



