ताज्या बातम्याआर्थिकराष्ट्रीय-राज्य

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात ‘एआयएफ’ संस्था महाराष्ट्र शासनासोबत काम करण्यास उत्सुक

जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांत परिवर्तनासह कौशल्य विकासासाठी ‘अमेरिकन इंडिया फाऊंडेशन’ (AIF) आणि महाराष्ट्र शासन संयुक्तपणे काम करणार आहे. ‘एआयएफ’चे संचालक कामेश संघी यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे नवी दिल्लीतील निवासी गुंतवणूक आयुक्त सुशील गायकवाड यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

गेल्या 25 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली अमेरिकन इंडिया फाऊंडेशन’ संस्था शासनाच्या प्राधान्यक्रमानुसार महाराष्ट्रात विविध प्रकल्प राबवण्यास उत्सुक आहे. या भागीदारीमुळे विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षण आणि आरोग्य सुविधेला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे.तसेच कौशल्य विकासासाठीही विविध उपक्रम राबविले जाणार आहेत . ‘एआयएफ’ने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक प्राधान्यक्रमांनुसार संयुक्तपणे काम करण्याची तयारी दर्शविली आहे. महाराष्ट्रातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था बळकट करणे, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी कौशल्य विकास प्रकल्प राबवणे यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

तसेच गेल्या अडीच दशकांपासून भारतातील विविध राज्यांमध्ये कार्य करण्याचा अनुभव ‘एआयएफ’कडे आहे. या अनुभवाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रात शाश्वत विकासाचे मॉडेल उभे करण्याबाबत गुंतवणूक आयुक्त गायकवाड यांनी यावेळी चर्चा केली.

राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सामाजिक उत्तरदायित्व आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे सहकार्य मोलाचे ठरते. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत ‘एआयएफ’ सोबत काम केल्यास तळागाळातील घटकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचवता येईल असा विश्वासही श्री गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.

अमेरिकन इंडिया फाऊंडेशनचे संचालक संघी यांनी यावेळी संस्थेच्या गेल्या 25 वर्षांतील कार्याचा आढावा सादर केला आणि महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक ते सर्व तांत्रिक सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button