ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईविकास

भारतातील पहिल्या संगीतमय रस्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी मार्गाला (कोस्टल रोड) आता नवी ओळख मिळाली आहे. मुंबईच्या वाहतुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारा हा मार्ग देशातील पहिला संगीतमय रस्ता ठरला आहे. या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज अमरसन्स गार्डनजवळ करण्यात आले.

उद्घाटनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे वाहन संगीतमय पट्ट्यांवरून धावत असताना ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटातील लोकप्रिय ‘जय हो’ या गाण्याची धून ऐकू आली. यावेळी त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे तसेच हंगेरी देशाचे कौन्सिल जनरल फ्रेंक जारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सागरी किनारी मार्गावरील उजव्या मार्गिकेवरून प्रवास करताना वाहनचालकांना संगीतमय रस्त्याचा अनुभव घेता येणार आहे. अद्ययावत हंगेरियन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ‘जय हो’ या जगप्रसिद्ध गाण्याची धून वाहनातील प्रवाशांना ऐकू येईल. पहिल्या टप्प्यात या मार्गावर ५०० मीटर लांबीच्या विशेष संगीतमय रिब्स (पट्ट्या) बसविण्यात आल्या आहेत.

या पट्ट्यांमधील विशिष्ट अंतर आणि त्यावरून ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या चाकांच्या घर्षणामुळे स्वरनिर्मिती होते. हे स्वर वाहनातील प्रवाशांना कोणत्याही अतिरिक्त उपकरणाशिवाय स्पष्टपणे ऐकू येतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान, भारतीय संस्कृती आणि संगीत यांचा संगम असलेला हा संगीतमय रस्ता देशभरात कुतूहलाचा विषय ठरणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.


थोडक्यात – संगीतमय रस्ता

  • भारतातील पहिला संगीतमय रस्ता
  • दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना मरीन ड्राइव्ह बोगदा संपल्यानंतर प्रारंभ
  • पहिल्या टप्प्यात ५०० मीटर लांबीच्या विशेष पट्ट्या
  • ६० ते ७० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या वाहनांच्या चाकांच्या घर्षणातून स्वरनिर्मिती
  • वाहनातील प्रवाशांना ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील ‘जय हो’ गाण्याची धून ऐकू येते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button