
रावेर (प्रतिनिधी): केऱ्हाळा बु. येथील स्वामी प्रि-प्रायमरी व समृद्धी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शुक्रवार, दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत चिमुकल्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर, शेतकरी, सैनिक, राणी लक्ष्मीबाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी विविध वेशभूषा साकारत उपस्थितांची मने जिंकली. आकर्षक वेशभूषेसोबतच विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण व स्पष्ट संवाद साधल्याने स्पर्धा अत्यंत रंगतदार ठरली.
यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना, अशा उपक्रमांमुळे मुलांचा आत्मविश्वास, वक्तृत्वकला आणि सर्जनशीलतेचा विकास होतो, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच पालकांनीही मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सहकार्य केले. फॅन्सी ड्रेस स्पर्धेमुळे संपूर्ण शाळा परिसर आनंदोत्सव आणि टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला.




