आरोग्यऐतिहासिकजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

गर्भवती महिलांसाठी दिलासादायक सुविधा; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात पेनलेस डिलिव्हरीची सुरुवात

जळगाव (प्रतिनिधी): प्रसूतीदरम्यान होणाऱ्या तीव्र वेदनांमुळे अनेक गर्भवती महिलांमध्ये भीती निर्माण होते. मात्र आता ही भीती दूर करणारी पेनलेस डिलिव्हरी (वेदनारहित प्रसूती) सुविधा जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात सुरू करण्यात आली असून, यामुळे महिलांना प्रसूतीदरम्यान मोठा दिलासा मिळणार आहे.

पेनलेस डिलिव्हरी ही आधुनिक व सुरक्षित वैद्यकीय पद्धत असून, यामध्ये प्रसूतीच्या वेळी महिलांच्या पाठीच्या कण्यात (स्पाईनमध्ये) विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे प्रसूतीदरम्यान होणाऱ्या असह्य वेदना मोठ्या प्रमाणात कमी होतात किंवा पूर्णतः थांबतात. विशेष म्हणजे या प्रक्रियेमुळे आई व बाळाच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ही सुविधा अत्याधुनिक उपकरणे, अनुभवी भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ यांच्या संयुक्त सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रसूतीपूर्व तपासणीपासून ते प्रसूतीनंतरच्या काळजीपर्यंत सर्व प्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या सतत निरीक्षणाखाली पार पाडल्या जातात.

नॉर्मल डिलिव्हरीला चालना

पेनलेस डिलिव्हरीमुळे महिलांचा मानसिक ताण कमी होतो. प्रसूतीविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होऊन अनेकदा भीतीपोटी निवडली जाणारी सिझेरियन शस्त्रक्रिया टाळता येते. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरीचे प्रमाण वाढण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

रुग्णालय प्रशासनाने ही सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली असून, ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य कुटुंबांनाही या आधुनिक उपचारांचा लाभ मिळावा, हा यामागील सामाजिक उद्देश आहे. उपचार प्रक्रियेत आवश्यक तपासण्या, औषधोपचार व डॉक्टरांचे मार्गदर्शन यांचा समावेश आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांची २४ तास सेवा

रुग्णालयात विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. मृदुला मुंगसे, डॉ. रश्मी संघवी, डॉ. ऐश्वर्या, डॉ. पल्लवी आणि डॉ. प्राजक्ता यांची तज्ज्ञ टीम २४ तास कार्यरत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीचे उपचार उपलब्ध करून दिले जातात. तसेच गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र प्रसूती कक्ष, स्वच्छता, सुरक्षितता आणि नवजात बाळासाठी आवश्यक सर्व सुविधा रुग्णालयात उपलब्ध आहेत.

कोट

“आधुनिक वैद्यकीय युगात महिलांनी प्रसूतीच्या वेदना सहन कराव्यात, असे अजिबात नाही. पेनलेस डिलिव्हरी ही सुरक्षित व प्रभावी पद्धत असून, आई आणि बाळाच्या आरोग्याला कोणताही धोका नाही. सर्वसामान्य महिलांनाही या सुविधेचा लाभ मिळावा म्हणून ही सेवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे,” असे आवाहन डॉ. ऐश्वर्या (डॉ. उल्हास पाटील रुग्णालय) यांनी केले.

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयाच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवेत एक सकारात्मक आणि आधुनिक बदल घडून येणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button