पंचायत निवडणुकीसाठी दोन अपत्यांच्या नियमाला बगल देण्याचा प्रयत्न; वडिलांकडून चिमुकल्या मुलीची निर्घृण हत्या

नांदेड (प्रतिनिधी): पंचायत निवडणुकीत उतरून सरपंच होण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी दोन अपत्यांच्या नियमाला बगल देण्यासाठी एका वडिलाने आपल्या सख्ख्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात सुरू झालेली ही घटना थेट तेलंगणातील कालव्यात जाऊन थांबली, जिथे एका चिमुकल्या मुलीचा मृतदेह आढळून आला.
या प्रकरणातील आरोपीची ओळख पांडुरंग कोंडमंगले (वय २८) अशी असून तो मुखेड तालुक्यातील केरूर गावात न्हावी व्यवसाय करत होता. पंचायत निवडणूक लढवून सरपंच होण्याची त्याची इच्छा होती; मात्र महाराष्ट्रात लागू असलेला दोन अपत्यांचा नियम त्याच्या मार्गातील मोठा अडसर ठरला.
पांडुरंगला तीन अपत्ये होती – एक तीन वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांच्या जुळ्या मुली. याच नियमातून सुटका मिळवण्यासाठी त्याने आपल्या मुलींपैकी प्राची हिला संपवण्याचा अमानुष निर्णय घेतल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
पोलिस तपासानुसार, या कटापूर्वी पांडुरंगने गावातील विद्यमान सरपंच गणेश रामचंद्र शिंदे यांच्याशीही चर्चा केली होती. सुरुवातीला मुलीला दत्तक देणे किंवा सोडून देण्याचा विचार करण्यात आला; मात्र जन्म प्रमाणपत्रावर नाव नोंद असल्यामुळे ही योजना फसली.
यानंतर हत्या अपघातासारखी भासवण्याचा कट रचण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, पांडुरंगने मुलगी प्राचीला मोटारसायकलवर बसवून तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील निजाम सागर कालवा येथे नेले आणि तेथे तिला कालव्यात ढकलून दिले. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला.
घटनेच्या वेळी परिसरातील शेतात काम करणाऱ्या ग्रामस्थांना पाण्यात काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी पाहणी केली असता एका चिमुकल्या मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. तपासात सत्य समोर येताच संपूर्ण परिसर हादरून गेला.
ही घटना केवळ एका हत्येपुरती मर्यादित नसून, सत्तेची लालसा माणुसकीपेक्षा मोठी ठरते तेव्हा समाज कुठे चालला आहे, याचे भयावह चित्र समोर आणणारी आहे. कायद्याला चुकवण्याच्या नादात जेव्हा नातेसंबंधच संपवले जातात, तेव्हा प्रश्न केवळ गुन्ह्याचा राहत नाही, तर आपल्या सामाजिक मूल्यांचाही होतो.




