महाराष्ट्रआर्थिकजळगावताज्या बातम्या

विकसित भारताच्या दिशेने महिला व युवा केंद्रस्थानी असलेला अर्थसंकल्प – आ. अमोल जावळे

अर्थसंकल्प २०२६ महिला युवा विकास:
जळगाव (प्रतिनिधी) : केंद्र सरकारचा अर्थसंकल्प २०२६–२७ हा विकसित भारत या संकल्पनेला बळ देणारा असून महिला व युवकांना केंद्रस्थानी ठेवणारा आणि सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट आराखडा मांडणारा असल्याची प्रतिक्रिया आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केली. आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि मानवी विकासावर विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

या अर्थसंकल्पात १२ लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आली असून हायस्पीड कॉरिडॉर, राष्ट्रीय जलमार्ग आणि ग्रीन मोबिलिटीसारख्या प्रकल्पांमुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. याचा थेट लाभ युवकांना मिळणार असून, कौशल्य विकास, स्टार्टअप्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवा शक्ती देशाच्या आर्थिक प्रगतीचा कणा ठरेल, असे आ. जावळे यांनी सांगितले.

महिला सक्षमीकरण हे अर्थसंकल्प २०२६ महिला युवा विकास योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लखपती दीदी योजना, महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, महिला उद्योजकांसाठी आर्थिक सहाय्य तसेच मुलींच्या शिक्षण व आरोग्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमुळे महिलांचा आर्थिक व सामाजिक सहभाग लक्षणीयरीत्या वाढणार आहे.

महाराष्ट्राला डिव्होल्यूशन ऑफ टॅक्सेशन अंतर्गत सुमारे ९८ हजार ३०६ कोटी रुपयांचा निधी मिळणार असून या निधीतून रस्ते, सिंचन, कौशल्य विकास, उद्योग आणि शहरी पायाभूत सुविधा अधिक सक्षम केल्या जातील. यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त केला.

“हा अर्थसंकल्प केवळ आकडेवारीपुरता मर्यादित नसून, महिला व युवा शक्तीच्या जोरावर विकसित भारत घडवण्याचा दृढ संकल्प यातून स्पष्टपणे दिसून येतो,” असे प्रतिपादन त्यांनी शेवटी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button