
जळगाव (प्रतिनिधी) : डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागातर्फे आरोग्य व स्वच्छता या उपक्रमांतर्गत सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान व मोफत तपासणी शिबिराचे आयोजन सोमवार, दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आले. हा उपक्रम प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. एस. बी. साळवे होते.
या प्रसंगी डॉ. प्रमोद पांढरे, तालुका आरोग्य अधिकारी, जळगाव तसेच डॉ. अश्विनी जोशी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, जळगाव महानगरपालिका यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून विद्यार्थिनींना सिकलसेल ॲनिमियाची कारणे, लक्षणे, प्रतिबंध व उपचार याबाबत सविस्तर माहिती दिली. सिकलसेल ॲनिमियाबाबत जनजागृती करणे व वेळेवर तपासणीचे महत्त्व पटवून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.
या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मोफत सिकलसेल ॲनिमिया तपासणी शिबिराचा लाभ १२० विद्यार्थिनींनी घेतला. तपासणीसाठी महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. एस. महाजन, डॉ. स्नेहल चौधरी, मनपा आरोग्य सेविका परिचारिका रजनी सूर्यवंशी, आशा सेविका नम्रता तायडे, सुषमा सपकाळे व ज्योत्सना वराडे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनीषा पाटील यांच्यासह प्रा. डॉ. सुजाता गायकवाड, प्रा. डॉ. नयन माहेश्वरी व प्रा. ज्योती भोई यांनी विशेष परिश्रम घेतले.
या शिबिरामुळे विद्यार्थिनींमध्ये सिकलसेल ॲनिमियाविषयी जागरूकता निर्माण झाली असून, आरोग्याबाबत सजग राहण्याचा संदेश देण्यात आला.




