स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल, रावेरच्या विद्यार्थ्यांनी रावेर बस आगाराला शैक्षणिक भेट दिली

रावेर (प्रतिनिधी) : स्वामी इंग्लिश मीडियम स्कूल, रावेर येथील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी बुधवार, दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी रावेर बस आगाराला शैक्षणिक भेट दिली. या भेटीचा उद्देश विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रत्यक्ष अनुभवून शिकवणे हा होता.
विद्यार्थ्यांना बस आगारातील कंट्रोलर रूम, पार्सल सेवा कक्ष, तिकीट रोकड शाखा आणि वाहन परीक्षक विभाग याची सविस्तर माहिती देण्यात आली. इंडियन ऑइल फ्युल स्टेशनवर बसमध्ये इंधन व तेल कसे भरले जाते हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखवण्यात आले. तसेच वॉशिंग सेंटर आणि मशिनरी विभागात बसची स्वच्छता व दुरुस्ती कशी केली जाते, हे विद्यार्थी पाहू शकले.
विद्यार्थ्यांनी ‘लालपरी’ या अत्याधुनिक बसची भेटही घेतली. या बसमध्ये आपत्कालीन दरवाजा, आरामदायी सीट्स, मोबाईल चार्जिंग सुविधा, वाय-फाय अशा आधुनिक सुविधा आहेत, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या शैक्षणिक भेटीला रावेर बस डेपोचे अधिकारी व कर्मचारी मार्गदर्शन करत होते. डेपो मॅनेजर इम्रान खान पठाण, कार्यशाळा अधीक्षक विश्वजीत तेली, वाहतूक निरीक्षक संदीप तायडे, वाहन परीक्षक अरविंद बिरपन व इतरांनी विद्यार्थ्यांना माहिती व मार्गदर्शन दिले. भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना खाऊ व पाणीही वाटप करण्यात आले.
ही शैक्षणिक भेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ज्ञानवर्धक ठरली. अनिता पाटील मॅडम यांनी या भेटीचे नियोजन केले, तर युवराज महाजन, दीपक माळी, सुनील पवार, निशा रायपुरकर, तेजस्विनी लासूरे आणि माधुरी वाणी विवेक पवार यांनी सहकार्य केले. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी ही भेट आनंदात अनुभवली.



