
नवी दिल्ली (प्रतिनिधी): प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘सरहद, पुणे’ आणि ‘महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली’ यांच्या संयुक्त विद्यमाने ७ व ८ मार्च २०२६ रोजी नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे पहिले अखिल भारतीय मराठी महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाची अधिकृत घोषणा आज नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त व सचिव आर. विमला यांनी केली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे तसेच ‘सरहद’चे सह-संयोजक लेशपाल जवळगे उपस्थित होते.
महाराणी तारा राणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून हे संमेलन आयोजित करण्यात आले असून, प्रशासनात कार्यरत महिला अधिकाऱ्यांमधील सुप्त साहित्यिक गुणांना ओळख मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संमेलनाच्या उद्घाटनासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, माजी लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
संमेलनादरम्यान तीन समांतर सभागृहांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक व साहित्यिक परिसंवाद, चर्चासत्रे, मान्यवरांच्या मुलाखती, काव्य संमेलन, पुस्तक प्रकाशन, गझल सादरीकरण तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल.
देशभरातील विविध राज्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत असलेल्या मराठी महिला शासकीय अधिकाऱ्यांनी या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
नोंदणीसाठी संकेतस्थळ sahityasammelan.sarhad.in असून अधिक माहितीसाठी लेशपाल जवळगे (८४८४०५५२५२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडतानाच साहित्य क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांसाठी हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.




