जळगावताज्या बातम्यायोजना

अन्न प्रक्रिया उद्योगांना शासकीय योजनांचे बळ – संतोष गवळी

जळगाव (प्रतिनिधी) : तंत्रज्ञानामुळे विविध क्षेत्रांमध्ये अमूलाग्र बदल होत आहेत आणि त्याचप्रमाणे अन्न प्रक्रिया उद्योगातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यवसायाच्या व्यापक संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील क्षमता लक्षात घेता अन्न प्रक्रिया उद्योगांना शासकीय योजनांचे बळ उपलब्ध आहे, तसेच अधिकाधिक व्यावसायिक व उद्योजकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाप्रबंधक (GM) संतोष गवळी यांनी केले.

ही भूमिका ते ‘झेड प्रमाणीकरण’ प्रक्रियेबाबत विशेष जागरूकता कार्यशाळेत बोलत होते. ही कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर, जिल्हा उद्योग केंद्र आणि डब्ल्यूएक्स कन्सल्टंट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रम सोमवारी (१९ जानेवारी) पार पडला.

कार्यशाळेच्या सुरुवातीला डब्‍ल्‍यूएक्स कन्सल्टंट्सच्या संचालिका आणि स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या संस्थापिका दीपाली चांडक यांनी प्रस्ताविक केले. त्यांनी तांत्रिक पाठबळ आणि स्व‑मूल्यांकनाचे महत्त्व स्पष्ट केले.

कार्यक्रमात बोलताना संतोष गवळी म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी उद्योजकांनी ‘झेड’ प्रमाणीकरण करणे काळाची गरज आहे. यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढीस लागेल तसेच पर्यावरणाचे रक्षणही सुनिश्चित होऊ शकते. स्थानिक उद्योजकांनी स्वतःच्या प्रक्रियांचे आधुनिकीकरण करून जागतिक स्तरावर स्पर्धा करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स‑उत्तर महाराष्ट्र यांच्या उपाध्यक्ष संगीता पाटील म्हणाल्या की, उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांना तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यास चेंबरने नेहमीच कटिबद्धता दाखवली आहे. सूक्ष्म आणि लघु उद्योगांनी प्रक्रियेत असलेल्या त्रुटी दूर करून कार्यक्षमतेचा वेग वाढवणे आवश्यक आहे; आजची कार्यशाळा यासाठीच फायदेशीर ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यशाळेत तज्ज्ञ ‘झेड’ प्रशिक्षकांनी दोन तांत्रिक सत्रांत उद्योजकांना मार्गदर्शन केले. यात स्व‑मूल्यांकन, तांत्रिक लेखापरीक्षण आणि प्रक्रिया सुलभीकरण यावर सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाचा समारोप डब्‍ल्‍यूएक्स कन्सल्टंट्सच्या एमएसएमई डेस्कच्या वरिष्ठ व्यवस्थापिका गौरी बैरागी यांनी करून उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल बैसा, निखिलेश काळे, स्वाती देवरे, भारत शेंडगे यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button