परळी वैजनाथमध्ये १३ फेब्रुवारीपासून तीन दिवसीय अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन

बीड (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात देशभरातील विविध प्रजातींचे एक हजाराहून अधिक पशू व पक्षी सहभागी होतील आणि त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून राज्यातील सर्व पशुपालकांना या प्रदर्शनाला सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रदर्शनात गायी, म्हशी, शेळ्या‑मेंढ्या, घोडे तसेच विविध दर्जेदार पक्षी यांचे आकर्षक दर्शन मिळणार आहे. ही संधी ग्रामीण पशुपालकांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती विभागाकडून देण्यात आली.
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की, येथे उपस्थितांना आधुनिक पशुपालन, आहार व्यवस्थापन व पशू आरोग्य याविषयी सविस्तर माहिती मिळणार आहे. त्यामुळे हा कार्यक्रम पशुपालन व्यवसायाला अधिक चालना देईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या प्रदर्शनाचे नियोजन राज्य पशुसंवर्धन विभागाचे सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी पद्धतीने करण्यात येत आहे. परळी वैजनाथ येथे प्रदर्शनासाठी भव्य मैदान आणि आवश्यक सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे, असेही सांगितले गेले.
पशुपालन व्यवसायासाठी नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्याचे हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. प्रशासनाकडून बीडसह राज्यातील सर्व पशुपालकांना या तीन दिवसीय प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




