जळगावताज्या बातम्यासामाजिक

गांधी रिसर्च फाऊंडेशनची उद्यापासून ग्राम संवाद सायकल यात्रा

जळगाव (प्रतिनिधी) : येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने (हुतात्मा दिनी) दरवर्षीप्रमाणे ग्राम संवाद सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी विचारांचा प्रचार-प्रसाराच्या उद्देशाने दि. ३० जानेवारी ते १२ फेब्रुवारी २६ दरम्यान निघणाऱ्या १४ दिवसीय सायकल यात्रेस राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रशासकीय अधिकारी लेफ्ट. कर्नल अश्विन वैद्य हिरवी झेंडी दाखविणार असून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., चे अध्यक्ष व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोकभाऊ जैन यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

ग्राम संवाद सायकल यात्रा यावर्षी महाराष्ट्र व गुजरात राज्यातील ५ जिल्ह्यातील १० तालुक्यातील ८० गावांना भेटी देणार असून सुमारे ४०० किमीचा प्रवास करणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी, युवक, महिला व नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. या सायकल यात्रेत भारतातील विविध राज्यातील व स्थानिक अशा ३५ स्वयंसेवकांचा सहभाग आहे.

यात्रेदरम्यान विविध शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शनी, मूल्य संवर्धनाचे खेळ, प्रश्नमंजुषा, कठपुतली खेळ या माध्यमातून चारित्र्य निर्माणाचे कार्य करणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी नागरिकांसाठी पथनाट्याद्वारे सामाजिक सद्भाव विषयावर प्रबोधन कार्यक्रम करण्यात येणार आहे. यात्रेत दररोज दोन कार्यक्रम शाळा / महाविद्यालयात तर रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर कार्यक्रम होणार आहे. भारतीय स्वातंत्र्यावरील प्रदर्शनी कार्यक्रमांच्या ठिकाणी लावण्यात येणार आहे.

स्वस्थ व्यक्ती… स्वस्थ समाज या संकल्पनेनुसार निरोगी व सशक्त समाजाच्या निर्मितीच्या उद्देशाने या यात्रेत प्रबोधन करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमांची सांगता भारताच्या प्रतिज्ञेने होणार आहे. विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग देऊन सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button