जळगावआरोग्यताज्या बातम्यापर्यावरणशेतकरी

सातपुडा पट्ट्याला अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान!

जळगाव (प्रतिनिधी) : सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सातपुडा पट्ट्यात आज झालेल्या भीषण अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचा अक्षरशः चिखल झाला आहे. सातपुडा पट्ट्यातील आभोडा बुद्रुक, आभोडा खुर्द, विश्राम जिनसी, ताडजींसी, मोरव्हाल, पाल, जुनोने, गारखेडा आदी गावांमध्ये लाखोंचे नुकसान झाले असून या भागाचे सर्वेक्षण होणे अपेक्षित आहे.

सातपुडा पट्ट्यातील केळी, पपई, मका आणि रब्बी हंगामातील गहू व हरभरा या पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत, तर काढणीला आलेला गहू जमिनीला टेकल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तसेच, कापूस वेचणी सुरू असलेल्या भागात कापूस ओला झाल्याने त्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

पंचनाम्याची मागणी
या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. “वर्षभर कष्ट करून पीक हातात येण्याची वेळ आली असताना निसर्गाने घात केला,” अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत आणि पीडित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. याबाबत जिल्हाधिकारी केव्हा कार्यवाही करतील, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हवामान विभागाने पुढील २४ तासांत या परिसरात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली असून, शेतकऱ्यांना आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button