रावेरच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व स्वामी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

रावेर (प्रतिनिधी): येथील स्वामी अकॅडमी संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर (सेमी व माध्यमिक विभाग) आणि स्वामी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या जल्लोषात आणि देशभक्तीपर वातावरणात साजरा करण्यात आला.
या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगरसेविका प्रमिलाताई पाटील व चुडामण पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र पवार होते. यावेळी संस्थेच्या सचिव मनिषा पवार, माध्यमिक मुख्याध्यापक राजू पवार, प्राथमिक मुख्याध्यापिका हिरकणी धांडे, इंग्लिश मिडियमचे प्राचार्य रातिश मौन, पर्यवेक्षिका कीर्ती निळे, अनिता पाटील, शिरीष मैराळे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्या प्रमिलाताई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी संविधानाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना देशप्रेम, शिस्त व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले. संस्थाध्यक्ष रवींद्र पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि जलव्यवस्थापनाचे महत्त्व पटवून दिले. “स्वच्छ व निर्मळ भारत घडवण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी:
याप्रसंगी इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्यप्रकार सादर केले, तर सेमी विभागाच्या लहान विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. ‘रंगोत्सव सेलिब्रेशन’ अंतर्गत विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून केलेले ‘संविधानाचे सामूहिक वाचन’. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन धनगर यांनी प्रभावीपणे केले. राष्ट्रगीताने व भारतमातेच्या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली.



