जळगाव पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा; पीएसआय संजय शेलार यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर!

३५ वर्षांची निष्कलंक सेवा आणि २४२ बक्षिसांचा मान: प्रजासत्ताक दिनी होणार गौरव
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवला गेला आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक संजय एकनाथ शेलार यांना २०२६ चे मानाचे ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (President’s Police Medal) जाहीर झाले आहे. त्यांच्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ, शिस्तप्रिय आणि निष्कलंक सेवेचा हा भारत सरकारकडून करण्यात आलेला यथोचित गौरव आहे.
संजय शेलार यांची कारकीर्द पोलीस दलातील शिस्त आणि समर्पणाचे एक उत्तम उदाहरण मानले जाते. त्यांच्या ३५ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक आव्हानात्मक कामे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना आतापर्यंत तब्बल २४२ बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
एकही रजा नाही, एकही शिक्षा नाही!
श्री. शेलार यांच्या कारकिर्दीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे ‘क्लीन सर्व्हिस रेकॉर्ड’. संपूर्ण ३५ वर्षांच्या प्रवासात त्यांना एकदाही कोणतीही शिक्षा, दंड किंवा ताकीद मिळालेली नाही. विशेष म्हणजे, आरोग्याप्रती कमालीची जागरूकता आणि कामावरील निष्ठेमुळे ते या प्रदीर्घ काळात एकदाही ‘सिक’ (Sick/आजारी) रजेवर गेलेले नाहीत. हा एक दुर्मिळ विक्रम मानला जात आहे.जिल्ह्यात आनंदाचे वातावरण२०२६ च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्या नावाची घोषणा होताच जळगाव पोलीस दलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सहकारी कर्मचाऱ्यांकडून शेलार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे जळगाव पोलीस दलाची मान संपूर्ण देशात उंचावली आहे.




