
मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. नगर विकास विभागाने या संदर्भात अधिकृत पत्रक जारी केले आहे. ही सोडत सकाळी ११ वाजता मुंबईतील मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावरील परिषद सभागृहात, नगरविकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या सोडतीकडे राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे, कारण आरक्षण निश्चित झाल्यानंतरच महापालिकांमधील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग येईल. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये महापौरपदासाठी कोण दावेदार असेल, हे या सोडतीनंतर स्पष्ट होईल.
महापौरपदाचे आरक्षण अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास वर्ग (OBC), आणि महिलांसाठी रोटेशन पद्धतीने निश्चित केले जाते. या सोडतीमध्ये कोणत्या प्रवर्गासाठी कोणते पद आरक्षित होईल, हे ठरणार आहे.




