
पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी जखमी
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी दि. १६ जानेवारी २०२६ रोजी एमआयडीसी परिसरात पार पडली. मात्र मतमोजणीदरम्यान फेरमतमोजणीची मागणी करत पिंप्राळा परिसरातील काही नागरिकांनी गोंधळ घातल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. या गोंधळात पोलिसांवर दगडफेक झाल्याने पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतमोजणी केंद्राबाहेर आल्यानंतर वखार महामंडळाच्या परिसरात काही नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन न करता घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर बॅरिकेट तोडण्याचा प्रयत्न करत जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप पोलिस प्रशासनाने केला आहे.
या दगडफेकीत यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्यासह कॉन्स्टेबल विजय रंधे, मोहित सोनवणे आणि अविनाश राजपूत हे चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. जखमी पोलिसांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी घोषणाबाजी करणे, बॅरिकेट तोडणे, पोलिसांवर दगडफेक करणे तसेच शासकीय कामात अडथळा आणणे या आरोपाखाली संशयित आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संशयित आरोपी म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुलभूषण वीरभान पाटील, त्यांचे बंधू पंकज वीरभान पाटील यांच्यासह सुमारे २०० ते २५० जणांचा समावेश आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश वाघ करीत आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंप्राळा परिसरासह संपूर्ण जळगाव शहरात एकच खळबळ उडाली असून परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत.




