
७५ पैकी ६९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत; भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने सुरुवातीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. महायुतीने एकूण ७५ पैकी ६९ जागांवर दणदणीत विजय संपादन केला असून, महापालिकेवर सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्यांनी ४७ पैकी ४६ जागा जिंकल्या आहेत.
पक्षनिहाय विजयी उमेदवार संख्या
• भाजप: ४६
• शिवसेना (शिंदे गट): २२
• शिवसेना (ठाकरे गट): ०५
• राष्ट्रवादी (अजित पवार गट): ०१
• अपक्ष: ०१
महायुतीची कामगिरी
महायुतीमध्ये भाजपने ४७, शिवसेना शिंदे गटाने २३ आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने ५ जागांवर उमेदवार उभे केले होते. यामध्ये भाजपला केवळ एका जागेवर पराभव स्वीकारावा लागला, तर शिंदे गटाचाही एक उमेदवार पराभूत झाला. मात्र, अजित पवार गटाला मोठा फटका बसला असून त्यांच्या ५ पैकी केवळ एकाच उमेदवाराला विजय मिळवता आला. टपाली मतमोजणीपासूनच महायुतीच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी मतदानाच्या शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली.
महाविकास आघाडीची स्थिती
महायुतीची लाट असतानाही महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने प्रभाग क्रमांक १७ मध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या प्रभागातील अक्षय वंजारी, इब्राहिम पटेल, जरीनाबी शब्बीर शहा आणि हीनाबी शाकीर खान या चारही उमेदवारांनी विजय मिळवला. याव्यतिरिक्त प्रभाग क्रमांक ६ मधून ठाकरे गटाच्या अर्शिन खाटीक विजयी झाल्या आहेत.
एकूणच ७५ पैकी ६९ जागा जिंकून महायुतीने जळगाव महापालिकेवर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.




