महाराष्ट्र बोर्ड परीक्षा ‘कॉपीमुक्त’ अभियानासाठी राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन!

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता १०वी आणि १२वी च्या परीक्षा पारदर्शक, कॉपीमुक्त आणि निकोप वातावरणात पार पडाव्यात, यासाठी राज्यशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी आणि गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने प्रभावी अंमलबजावणीकरिता “राज्यस्तरीय दक्षता समिती” गठित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
सध्या प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या कार्यरत आहेत. मात्र, राज्यस्तरावर समन्वय, नियंत्रण आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र राज्यस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य परीक्षा कालावधीत केंद्रांना भेटी देऊन पाहणी करतील. या निर्णयामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा अधिक पारदर्शक होतील आणि गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा आहे.
शासन निर्णय – “इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी च्या प्रमाणपत्र परीक्षेमध्ये होणारे गैरप्रकार टाळणे, सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात पार पडतील असे सुकर वातावरण निर्माण करणे व यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढ होण्याच्या दृष्टीने इयत्ता १० वी व इयत्ता १२ वी परीक्षेसाठी कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याकरिता पुढीलप्रमाणे “राज्यस्तरीय दक्षता समिती” गठित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.”
राज्यस्तरीय दक्षता समिती
• अध्यक्ष – आयुक्त (शिक्षण)
• सदस्य – अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे, विशेष पोलीस महानिरीक्षक (सर्व परिक्षेत्र), अतिरिक्त आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व), शिक्षण संचालक (प्राथमिक), पुणे, शिक्षण संचालक (माध्यमिक, व उच्च माध्यमिक), पुणे, शिक्षण संचालक (योजना), पुणे
• सदस्य-सचिव – सचिव, राज्य मंडळ, पुणे.
▪️राज्यस्तरीय दक्षता समितीची जबाबदारी
राज्यस्तरीय दक्षता समितीने इ.१० वी व इ.१२ वी च्या परीक्षा शांततेत व तणावमुक्त वातावरणात पार पडतील असे वातावरण निर्माण करावे. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढ होण्याच्या दृष्टीने इ.१० वी व इ.१२ वी परीक्षेसाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबतची जबाबदारी पार पाडावयाची आहे.
▪️जिल्हास्तरीय दक्षता समितीची जबाबदारी व कार्ये :
शासन निर्णय कमांक परीक्षा १६२५/प्र.क. २२१/एसडी-२. दिनांक २४ नोव्हेंबर, २०२५ नुसार जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या दक्षता समितीचे पुनर्गठन करण्यात आलेले असून सदर दक्षता समितीची जबाबदारी व कार्ये खालीलप्रमाणे राहतील.
१) आपल्या जिल्हयातील परीक्षा कॉपीमुक्त व निकोप वातावरणात पार पाडण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधीत जिल्हा दक्षता समितीची राहील.
२) परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सुविधा सुव्यवस्थित आहेत का याची जिल्हा समितीने खात्री करावी.
३) जिल्हयातील सर्व उपद्रवी व संवेदनशील केंद्राची माहिती संकलीत करणे, उपद्रवी च संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये व परीक्षेशी संबंधीत सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही (CCTV) उपलब्ध राहतील व सदर चित्रिकरणाची साठवणूक (Data Storage) होत असल्याबाबतची खात्री करणे.
४) कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविणेसाठी सीसीटीव्ही (CCTV) चा Access जिल्हा प्रशासनाने आपल्या कार्यालयात ठेवावा व त्याबाबतची खात्री समितीने करावी.
५) जिल्हयातील मोठ्या परिरक्षक केंद्रासाठी (Custody) प्रश्नपत्रिका नेणे व उत्तरपत्रिका गोळा करण्यासाठी आवश्यकतेनुसार शासकीय वाहने अधिग्रहीत करून सदर वाहने संबंधित केंद्रांना उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी.
६) प्रश्नपत्रिकांची वाहतूक करताना सहाय्यक परिरक्षकासोबत (रनर) सुरक्षिततेसाठी पोलीस कर्मचारी अथवा होमगार्ड शिपाई देण्याची कार्यवाही करावी.
७) राज्यातील उपद्रवी व संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा दक्षता समितीमार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची निगराणी करणे तसेच परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा दक्षता समितीमार्फत व्हिडीओ चित्रिकरणाची व्यवस्था करावी.
८) जिल्हयातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथके व बैठी पथके उपलब्ध होतील याचे नियोजन करावे. प्रत्येक भरारी पथकामध्ये किमान एक महिला प्रतिनिधीचा समावेश करण्यात यावा.
९) परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावर बाहय उपद्रव होणार नाहीत या दृष्टिकोनातून केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याबाबत संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावे.
१०) Maharashtra Prevention of Malpractices Act १९८२ या कायद्याची अंमलबजावणी करावी व कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही करावी.
११) परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात यावे तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू कराव्यात.
१२) प्रशासनामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकांनी परीक्षा केंद्राची तपासणी योग्य पद्धतीने करण्याबाबत संबंधितांना सूचना द्यावी जेणेकरून परीक्षार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही.
परीक्षेतील गैरप्रकार परिणामकारक पध्दतीने रोखण्यासाठी तसेच परीक्षा कॉपीमुक्त व निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी विभागीय आयुक्तांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. त्यांच्या अखत्यारित भरारी पथक नियुक्त करावे. त्यांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देवून कॉपीमुक्त अभियान परिणामकारक पध्दतीने राबवीणेबाबतची कार्यवाही करावी.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक क्रमांक २०२६०१०९१८३८१८०५२१ असा आहे. हा आदेश तुषार महाजन (उपसचिव, महाराष्ट्र शासन) यांच्या डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.




