आरोग्यकलाकारजळगावताज्या बातम्यासामाजिक

सारंगीचे स्वर अन् कथ्थक नृत्याविषकाराने रंगली मैफील

बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे गुंफले पुष्प

जळगाव (प्रतिनिधी) : सारंगीच्या स्वरांना भावनांचे स्वरूप दर्शन घडवत उस्ताद साबीर खान यांनी सादर केलेला आविष्कार आणि निधी प्रभू व कुणाल ओम यांची कथक – फ्लेमेंको जुगलबंदीचे सादरीकरण हे बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.  

छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात येथील स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या २४ व्या अर्थात द्वितपपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे औपचारिक उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, डॉ. विवेकानंद कुलकर्णी, दीपक चांदोरकर, सारंगीवादक उस्ताद साबीर खान, तबला वादक विवेक पांड्या यांच्या हस्ते करण्यात आले.

उस्ताद साबीर खान यांनी आपल्या मैफिलीची सुरुवात राग वाचस्पतीने केली. या रागामध्ये ‘यमन’ची छटा मिसळत त्यांनी रूपक तालात निबद्ध असलेला ‘बडा ख्याल’ सादर केला. अत्यंत सुरेल आणि संयत वादन हीच त्यांची खरी ओळख असून, त्यांच्या सादरीकरणात घराण्याची समृद्ध परंपरा आणि सारंगी वादनाचा वारसा ठळकपणे रसिकांना जाणवला.


​बड्या ख्याल्यानंतर त्यांनी द्रुत तीनतालातील बंदिश सादर करून मैफिलीला एका वेगळ्या उंचीवर नेले. सादरीकरणात उपशास्त्रीय संगीताचा आधार घेत त्यांनी लोकसंगीताचा देखील काही रंग भरला. जळगावच्या रसिक श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ​या संपूर्ण मैफिलीला अमेरिकास्थित तरुण तबलावादक विवेक पंड्या यांची तितकीच दमदार साथ लाभली. त्यांच्या चक्रधार आणि तिहाय्यांच्या अचूक मांडणीने रसिकांची मने जिंकली. ‘लग जा गले …’ हे गाणे रसिकांच्या प्रतिसादासह पेश केले. ‘यारा सिली सिली’, ‘पिया बसंती रे…’, ‘अलबेला सजन आयो रे…’  पेश केले. ‘रघुपती राघव …या भजनाने मैफिल पूर्ण झाली…सुरावटी आणि लयीच्या या अप्रतिम संगमाची अनुभूती घेत श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

जुईली कलभंडे गुरुवंदना सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला खाडीलकर यांनी केले.

महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व संस्कृती मंत्रालय भारत सरकार, रतनलाल सी बाफना ज्वेलर्स असून सुहान्स केमिकल्स प्रा. लि., दाल परीवार,  वेगा केमिकल्स प्रा. लि. न्युबो टेक्नॉलॉजीस, चांदोरकर टेक्नॉलॉजीस प्रा. लि. यांचेही सहकार्य आहे.

ज्येष्ठ कलाकारांचा कृतज्ञता सन्मान

बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या मध्यंतरात शहरातील संगीत कला क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या १४ ज्येष्ठ कलाकारांचा गौरवपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांच्या समृद्ध कलायात्रेचा आणि सांस्कृतिक वारशातील मोलाच्या योगदानाचा या निमित्ताने कृतज्ञतेने सन्मान करण्यात आला. त्यात रंगोपंत उर्फ अण्णासाहेब करकरे, विनायकराव पुराणिक, लक्ष्मण कुलकर्णी उर्फ भाऊ डोंगरे, पं.गोविंदराव कुलकर्णी, शरद धर्माधिकारी, पांडुरंग उर्फ आप्पासाहेब चिकेरूर, नारायण पटवारी, कुसुम रावेरकर, पुष्पा साखळीकर, तालमणी पं. जयंत नाईक, यादवेंद्र लांभाते, मुरलीधर पंत खानोरे, हरिभाऊ रघुनाथ देशपांडे, स्व .वसंतराव चांदोरकर इ. च्या कार्याचा गौरव झाला.


महोत्सवाच्या द्वितीय सत्रात निधी प्रभू यांनी कथ्थक आणि कुणाल ॐ यांनी फ्लेमिंको सादर केले. त्यात निधी प्रभू यांनी लक्ष्मी वंदनेने सुरुवात केली. त्यानंतर अन्वट असा लक्ष्मी ताल सादर करून कुणाल ओम यांनी ‘फारुका (Farruca)’ सादर केले, ज्याची उगमस्थाने स्पेनमधील गॅलिशिया येथे आहेत. त्यानंतर ते ‘बास्तोन’ (काठ्या) यांचा वापर करून भारतीय लय, पढंत आणि बोल यांचा समावेश असलेली जुगलबंदी सादर केली.
रसिकांनी पारंपरिक कथक रचना आणि अस्सल फ्लामेन्को संगीत यांचा, भारतीय तबला आणि स्पॅनिश पर्कशनसह सुंदर मिलाफ अनुभवला. या सादरीकरणात रॉ आणि जिप्सी फ्लामेन्को शैली तसेच कथकची सौंदर्यपूर्ण लालित्य यांचा संगम होऊन एक जादुई अनुभव निर्माण करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. सागिरिया मधे स्पॅनिश गाण्यावर विरह भाव दाखवत निधी यांनी रसिकांची मने जिंकली. त्यानंतर रूपक तालातील दोन गाण्यांची जुगलबंदी सादर करून सूफीने कार्यक्रमाची सांगता केली.

11 जानेवारी ला संगीत महोत्सवाचा समारोप
11 जानेवारी रोजी महोत्सवाच्या समारंभात पहिल्या सत्रात यशस्वी सिरपोतदार यांच्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाची अनुभूती घेता येईल. दुसऱ्या सत्रात  श्रेया देवनाथ व्हायोलीन वादन तर जी.जीवा हे ताविल वादन करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button