
२८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव (प्रतिनिधी) : एमआयडीसी पोलिसांनी नुकत्याच झालेल्या एका घरफोडी प्रकरणाचा छडा लावून एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून ₹२८,००० किमतीचे नळ आणि लाईट फिटिंगचे साहित्य जप्त केले आहे. शहरातील टि.एम. नगर येथे नवीन बांधकाम सुरू असलेल्या घरामध्ये २८ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२६ दरम्यान ही चोरी झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांच्या मदतीने तपास केला असता सैय्यद उबेद सैय्यद रफीक पटवे (वय 19 वर्षे, रा. मास्टर कॉलनी, जळगांव) याला अटक करण्यात आली. तसेच चौकशीदरम्यान त्याचा एक साथीदार अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले.
यांनी केली कारवाई
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोख नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल रमेश चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे, नितीन ठाकुर, राहुल घेटे, किरण पाटील आदींनी केली. नेत्रम विभाग, जळगाव येथील नेमणुकीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल पंकज खडसे, कुंदनसिंग बयस, मुबारख देशमुख यांचे मदतीने फुटेजची पाहणी करण्यात आली. पुढील तपास सफौ विजयसिंग पाटील आणि पोकों निलेश पाटील करत आहेत.




