आरोग्यआर्थिकजळगावताज्या बातम्याशासकीय

विशेष कर वसुली मोहिमेतून ९ कोटी १७ लाखांची विक्रमी वसुली

सीईओ मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतींची प्रभावी कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत ग्रामस्थांकडील घरपट्टी व पाणीपट्टीची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल (आयएएस) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कर वसुली मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, या माध्यमातून ९ कोटी १७ लाख ४६ हजार रुपयांची कर वसुली करण्यात आली आहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत चालू आर्थिक वर्षाचा १०० टक्के कर भरणा करणाऱ्या ग्रामस्थांना मागील थकबाकीवर ५० टक्के सूट देण्यात आली होती. या सवलतीचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत ग्रामस्थांनी थकित कर भरणा करून ग्रामपंचायतींच्या आर्थिक सक्षमतेस हातभार लावला आहे.

ग्रामपंचायत विभागामार्फत यापूर्वी देखील थकीत कर वसुलीसाठी लोकअदालतीच्या माध्यमातून तडजोडीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. लोकअदालतीच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर कर वसुली साध्य झाली होती. त्याचप्रमाणे ३१ डिसेंबर २०२५ अखेर कर भरणा करणाऱ्या ग्रामस्थांना ५० टक्के सूट देण्याचा निर्णयही प्रभावी ठरला आहे.
या मोहिमेच्या यशस्वितेसाठी ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी एस अकलाडे यांच्या सह ग्रामविस्तार अधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी यांचे सह स्थानिक पातळीवरील अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या मोहिमेमुळे ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली असून, विकासकामांसाठी आर्थिक बळकटी मिळाली आहे. पुढील काळातही कर वसुलीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करून पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन राबविले जाईल, असे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button