
राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप 2025: अंडर-17 महिला फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
जळगाव (प्रतिनिधी) : महिलांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग केवळ त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचा नाही, तर तो त्यांच्या आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक समावेशाच्या दृष्टीनेही अत्यंत मोलाचा आहे. फुटबॉल खेळाचे बहुआयामी मूल्य स्पष्ट केले व महिला खेळाडूंना प्रोत्साहन देताना शिस्त, समर्पण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कौशल्यवृद्धी करण्याचा संदेश देत, शारीरिक व मानसिक दृष्टीने लक्ष्य देऊन खेळलो तर आपल्याला यश मिळते असे मार्गदर्शन बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही एल माहेश्वरी यांनी केले.
अनुभूती निवासी स्कूलच्या फुटबॉल मैदानावर सीआयएसई नॅशनल प्री-सुब्रतो 17 वर्षाखालील महिलांच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानि जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन होते. याप्रसंगी सीआयएसईच्या मुंबई विभागाचे क्रीडा समन्वयक सिद्धार्थ किलोस्कर, सीआयएसई बोर्ड कौन्सिलचे सह सचिव अर्जित बसू उपस्थित होते. अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. समारंभाची सुरुवात डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी ध्वजारोहणाने केली, ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.
अनुभूती शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘आरंभ है प्रचंड है’ हे जोशपूर्ण गीत व रिधम नृत्य सादर केले, ज्याने उपस्थितांचे मन जिंकले. अर्जित बसू यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी सामूहिक शपथ घेतली. ज्यामध्ये सर्वांनी उभे राहून लक्ष केंद्रित केले. यानंतर डॉ. विजय माहेश्वरी व अशोक जैन यांनी ट्रॉफीचे अनावरण करून स्पर्धेची औपचारिक सुरुवात केली. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी यांनी औपचारिक मशाल प्रज्वलन करून ती साची पाटील यांना सुपूर्द केली, ज्यामुळे स्पर्धेची अधिकृत सुरुवात झाली.
विविध राज्यांतील शाळांचा सहभाग
यावेळी आलेल्या संघाचे मार्च पास परेड झाले. त्यात एकतेचे प्रतीक विविध राज्यांतील आणि भाषिक पार्श्वभूमी असलेल्या संघांनी मार्च पास्टमध्ये भाग घेतला, ज्यामुळे ‘विविधतेत एकता’ हे भारताचे तत्त्व अधोरेखित झाले. यामध्ये एकलव्य स्कूल (अहमदाबाद, गुजरात), रामकृष्ण मिशन स्कूल (जमशेदपूर, झारखंड), ग्रीनवुड हायस्कूल (सर्जापूर, बेंगलुरू, कर्नाटक), बिशप स्कूल (उंद्री, महाराष्ट्र), संत बाबा हरीसिंग शाळा (पंजाब), सेंट मायकेल्स शाळा (चेन्नई, तमिळनाडू), सेठ एम. आर. जयपूरिया शाळा (लखनौ, उत्तर प्रदेश), कोलकाता आणि सेंट जोसेफ शाळा (हैदराबाद, तेलंगणा) येथील शाळांचा सहभाग आहे. राष्ट्रगीताने उद्घाटन सोहळ्याचा समारोप झाला.