
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव मनपा निवडणुकीत पुन्हा महायुतीचे गणित चुकल्याने निवडणुकीपूर्वीच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप – शिंदे सेनेच्या जागावाटपाचा तिढा सुटण्यासाठी आज झालेल्या महायुतीची बैठक फेल झाली असून यामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे उदयाला येण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा झाला असून, आज (दि.२८) रविवारी झालेल्या बैठकीत महायुतीची चर्चा अखेर फिस्कटली आहे. अजिंठा विश्रामगृह येथे सकाळी महायुतीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, निवडणूक प्रभारी आ. मंगेश चव्हाण आणि आ. राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, आपल्याला अपेक्षित जागा मिळत नसल्याचे पाहून पालकमंत्री गुलाबराव पाटील बैठकीतून तडकाफडकी उठून निघून गेले आहे. तसेच मंत्री गिरीश महाजन हेदेखील नाशिकला रवाना झाले आहे.
असा होता फार्मुला
शिवसेनेने (शिंदे गट) २५ जागांची आग्रही मागणी केली होती. मात्र, भाजपने शिवसेनेला १९ आणि राष्ट्रवादीला (अजित पवार गट) ६ जागा देण्याचा प्रस्ताव मांडला. शिवसेनेला हा प्रस्ताव मान्य नसल्याने बैठकीत तणाव निर्माण झाला.




