शिक्षक, विद्यार्थी व पालकांसाठी व्यावसायिक क्षमता वृद्धी व डिजिटल सुरक्षितता कार्यशाळा उत्साहात

रावेर (प्रतिनिधी) : मॅक्रो व्हिजन अकॅडमी स्कूल, रावेर यांच्या पुढाकाराने CBSE Counselling Hub School व गोयल ब्रदर्स प्रकाशन यांच्या सहकार्याने शिक्षक व पालकांसाठी व्यावसायिक क्षमता वृद्धी (Professional Capacity Building) तसेच विद्यार्थ्यांसाठी जीवनकौशल्य व डिजिटल सुरक्षितता या विषयावर ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत प्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते यश संदीप महाजन यांनी मार्गदर्शन केले. श्री. महाजन हे दहावीमध्ये ९६.४% गुणांसह टॉपर, डिप्लोमामध्ये ९४.१३% गुणांसह टॉपर, तसेच अभियांत्रिकी शिक्षणात ९.५६ CGPA मिळवणारे गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांनी २० पेक्षा अधिक हॅकाथॉन स्पर्धांमध्ये विजय मिळवला असून त्यांना सिटीबँक येथे PPO (Pre-Placement Offer) प्राप्त आहे.
मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक प्रगती (Academics), सकारात्मक वर्तन (Behavior) आणि सुरक्षितता (Safety) या तीन महत्त्वाच्या घटकांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सर्वांना समजेल अशा सोप्या सुटसुटीत व आकर्षक भाषाशैली वापरून आपले मुद्दे स्पष्टपणे येथे मांडण्यात आले. विषयवस्तूपेक्षा शिकवण्याच्या पद्धतीवर लक्ष केंद्रित करणे, विद्यार्थ्यांमध्ये ध्यानधारणा व आत्मसंयमाची सवय लावणे, चांगल्या सवयी अंगीकारण्यासाठी शिस्त पाळणे, तसेच प्रत्येक नियमामागील “का?” स्पष्ट करणे यावर विशेष भर देण्यात आला.
तसेच डिजिटल युगातील मुलांचे संरक्षण या विषयांतर्गत सायबर बुलिंग, गेमिंगचे व्यसन, सोशल मीडियाचा अतिरेक व ऑनलाइन गुन्हेगारांचे धोके याबाबत सखोल व उपयुक्त माहिती देण्यात आली. सदर उपक्रम शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे सर, शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन धनगर सर तसेच शाळेच्या शैक्षणिक संचालक वनिता पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. त्यांच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना या सत्राचा खूप मोठा लाभ मिळाल्याची भावना शिक्षक व पालकांनी व्यक्त केली.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन व डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मोलाची मदत झाली. शाळेचे चेअरमन श्रीराम पाटी, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील यांनी या सत्रातून विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य जोपासले जाण्याचा आनंद व्यक्त केला आहे. तसेच शाळेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले, डायरेक्टर विनायक पाटील, धनराज चौधरी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.




