
ऐनपूर, ता.रावेर (प्रतिनिधी) : ऐनपूर गावात प्राण्यांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि त्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी आणि पाळीव प्राण्यांच्या मालकांनी सहभाग घेतला.या शिबिरात गायी, म्हशी यांसारख्या विविध प्राण्यांना रोगप्रतिबंधक लसी टोचण्यात आल्या.
लसीकरणामुळे त्यांच्या आरोग्याचे संरक्षण होणार असून, रोगप्रसार रोखण्यास मदत होणार आहे. या शिबिरामध्ये डॉ. स्वरूप लिंगायत आणि व्रणोपचारक रघुनाथ इंगळे या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राण्यांना लसीकरण करून दिले. त्यांनी शिबिरात सक्रिय सहभाग घेत लसीकरणाचे महत्त्व गावकऱ्यांना समजावून सांगितले.
या उपक्रमाचे आयोजन ऐनपूर पशुसंवर्धन विभाग व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, प्रा. बी.एम. गोणशेटवाड व प्रा. व्ही.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत गौरव महालकर, सौरव महेर, पियुष नेहते, कुणाल सपकाळे, पुष्पराज शेळके यांनी ऐनपूर (ता. रावेर) येथे केले होते. या उपक्रमामुळे गावात प्राणी आरोग्याबाबत जनजागृती वाढली असून, भविष्यात असे उपक्रम वारंवार व्हावेत अशी ग्रामस्थांची इच्छा आहे.