जळगावताज्या बातम्यानिवडनिवडणूकराजकारण

यावलच्या नगराध्यक्षपदी उबाठाच्या छाया अतुल पाटील यांचा विजय

भाजपाच्या रोहिणी फेगडे यांचा पराभव

यावल (प्रतिनिधी) : नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार छाया अतुल पाटील यांनी निर्णायक विजय मिळवत शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रोहिणी उमाकांत फेगडे यांचा सुमारे ५ हजारांहून अधिक मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदाची विजयी माळ गळ्यात घातली आहे.

यावल नगरपालिकेसाठी दि. २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. मात्र विविध कारणांमुळे मतमोजणीला तब्बल १९ दिवसांचा विलंब झाला. अखेर रविवार, दिनांक २१ डिसेंबर रोजी यावल तहसील कार्यालयात मतमोजणी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मतमोजणी शांततेत पूर्ण करण्यात आली. निकालानुसार उबाठा गटाच्या छाया अतुल पाटील यांनी एकूण १४ हजार ५० मते मिळवली, तर भाजपच्या रोहिणी उमाकांत फेगडे यांना त्यापेक्षा सुमारे पाच हजारांहून कमी मते मिळाली.

या मोठ्या मताधिक्यामुळे छाया पाटील यांचा विजय दणदणीत ठरला असून, त्यांनी यावल नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे. विजयाची अधिकृत घोषणा होताच मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या शेकडो समर्थकांनी जल्लोष केला. ढोल-ताशे, फटाके आणि जोरदार घोषणाबाजी करत समर्थकांनी आनंद व्यक्त केला. यावल शहरात उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button