
भडगावातील नर्सरी शाळेत घडली घटना; परिसरात हळहळ
जळगाव (प्रतिनिधी) : शाळेच्या बाजूला असलेल्या नाल्यात पाय घसरून पडल्याने दोन चिमुकल्यांचा अंत झाल्याची दुदैवी घटना दि. १६ डिसेंबर रोजी एका नर्सरी शाळेत घडली. या घटनेत अंश सागर तहसीलदार (वय ३ वर्षे ६ महिने) , मयंक ज्ञानेश्वर वाघ (वय ४ वर्षे) या बालकांचा मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भडगावातील आदर्श कन्या विद्यालयाच्या इंग्लिश मीडियम नर्सरी शाळेच्या परिसराला संरक्षण देणारी भिंत पुराच्या पाण्यामुळे कोसळली होती. दरम्यान, नाल्याजवळ असलेल्या बाथरूममध्ये गेलेल्या दोन्ही चिमुकल्यांचा पाय घसरून त्या नाल्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर दोघांना तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; डॉक्टरांनी तपासणी अंती मृत घोषित केले. यावेळी पालकांनी काळीज चिरणारा आक्रोश केला.
शाळा प्रशासनाच्या भोंगळ व दुर्लक्षित कारभारामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.




