आंदोलनजळगावताज्या बातम्याशेतकरीसमस्या

सावदा मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी काढलेल्या विम्याची अद्याप प्रतीक्षा

तात्काळ भरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

✍️ धामोडी, ता. रावेर (प्रतिनिधी) : सावदा मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी २०२४ मध्ये काढलेल्या पीक विम्याची रक्कम अद्याप मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नैसर्गिक आपत्ती, वादळी वारे व अतिवृष्टीमुळे केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही विमा कंपन्यांकडून भरपाई न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. विमा भरपाई मिळाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सावदा मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

सावदा मंडळात उदळी बु.,उदळी खु., लूमखेडा, तासखेडा, रणगाव, रायपूर, सुतगाव, गहूखेडा आदी गावांतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केळी पीक विमा उतरविला होता. मात्र इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळालेला असताना सावदा मंडळातील शेतकरी मात्र अद्याप वंचित असल्याचे चित्र आहे.

केळी उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होत असून बँकांचे कर्ज, मजुरी, खते, औषधे यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारभाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा परिस्थितीत पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार असतो. मात्र विमा असूनही रक्कम न मिळाल्याने शेतकरी हताश झाले आहेत.

“आम्ही वेळेत पीक विमा भरला, सर्व कागदपत्रे पूर्ण केली, तरीही विम्याची रक्कम मिळत नाही. शासन व विमा कंपन्यांनी तातडीने लक्ष द्यावे व विम्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी,” अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. जर लवकरात लवकर विमा भरपाई मिळाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सावदा मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button