जळगाव महापालिका निवडणूक; ‘भाजप’कडून इच्छुक उमेदवारांच्या १५ डिसेंबरपासून मुलाखती

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल लवकरच लागणार असून यासाठी भारतीय जनता पार्टीने आगामी महानगरपालिकेच्या भाजपा इच्छुक उमेदवारांचे मुलाखतीचे शुभारंभ सोमवार, दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून होत आहे. भारतीय जनता पार्टी, जिल्हा कार्यालय, (जी.एम.फाउंडेशन जळगाव) येथे मुलाखती घेण्यात येणार आहे.
जी.एम.फाउंडेशन येथे महाराष्ट्राचे राज्याचे भाजपा नेते व मंत्री गिरीश महाजन, जिल्हा निवडणूक प्रभारी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जळगाव लोकसभा खासदार स्मिताताई वाघ, महानगरपालिका निवडणूक प्रमुख आमदार सुरेश (राजुमामा) भोळे, जिल्हाध्यक्ष दिपकभाऊ सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे.
मुलाखती मंडल व प्रभाग निहाय
भाजपने या मुलाखती मंडल व प्रभागनिहाय घेण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मंडल क्रमांक ०१ अंतर्गत प्रभाग क्रमांक १, २, ३ आणि ४ साठी सकाळी ११ वाजता मुलाखती होतील. मंडल क्रमांक ०२ अंतर्गत प्रभाग क्रमांक ५, ६, ७ आणि १५ साठी दुपारी १२ वाजता मुलाखती घेतल्या जातील. मंडल क्रमांक ०३ अंतर्गत प्रभाग क्रमांक ११, १२ आणि १३ साठी दुपारी २ वाजता मुलाखती होणार आहेत.
यानंतर मंडल क्रमांक ०४ अंतर्गत प्रभाग क्रमांक १४, १६, १७, १८ आणि १९ साठी दुपारी ३ वाजता, तर मंडल क्रमांक ०५ अंतर्गत प्रभाग क्रमांक ८, ९ आणि १० साठी दुपारी ४ वाजता मुलाखती घेतल्या जाणार आहेत. सर्व इच्छुक उमेदवारांनी त्यांना दिलेल्या वेळेनुसार अचूक उपस्थित राहावे, असे स्पष्ट निर्देश भाजपकडून देण्यात आले आहेत.
सर्व मुलाखती केवळ सोमवार, १५ डिसेंबर रोजी आणि जाहीर केलेल्या वेळेतच पार पडणार असून या संदर्भात कोणताही बदल होणार नसल्याची माहिती भाजप जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा संयोजक विशाल त्रिपाठी आणि नितीन इंगळे सहसंयोजक, जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक यांनी दिली आहे. या प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती जाहीर करण्यात आल्याचे भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी स्पष्ट केले.




