जिल्ह्यात आधुनिक निर्यात सुविधा केंद्रे उभारण्यात यावे!

नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार अमोल जावळे यांची मागणी
रावेर (प्रतिनिधी) : केळी निर्यात क्षमतेत वाढ करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, तसेच जळगाव जिल्ह्यात आधुनिक निर्यात सुविधा केंद्रे (Export Facility Centres) उभारण्याची आवश्यकता आहे. निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी स्कर्टिंग बॅग्स, बड इंजेक्शन आणि टिश्यू कल्चर रोपे यावर शासनाने अनुदान द्यावे, ज्यामुळे केळी उत्पादकांना आर्थिक बळ मिळेल व जळगाव जिल्ह्याची निर्यात क्षमता वाढेल, अशी मागणी गुरुवारी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केली.
नागपूर हिवाळी अधिवेशनात रावेर–यावल विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या आमदार अमोलभाऊ जावळे यांनी मांडल्या. यासोबतच केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या ‘केळी महामंडळ’ स्थापनेचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नदेखील आमदार जावळे यांनी ऐरणीवर आणला. या महामंडळासाठी प्रस्तावित असलेला ₹१०० कोटी निधी तातडीने निर्गमित करून शेतकऱ्यांपर्यंत त्याचा थेट लाभ पोहोचवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. केळी उत्पादन, संशोधन, गुणवत्ता नियंत्रण आणि बाजार व्यवस्थापनासाठी हे महामंडळ अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
याशिवाय जिल्ह्यातील केळी पिकाला करपा व इतर रोगांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शासनाने आवश्यक औषधे उपलब्ध करून द्यावीत आणि करपा नियंत्रणासाठी स्वतंत्र ‘करपा पॅकेज’ जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. केळीत दिसणारी चिलिंग इंज्युरी कमी करण्यासाठी संशोधन तातडीने राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेल्या काँग्रेस गवतामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसानही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. हे गवत समूळ नष्ट करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करून प्रभावी उपाययोजना राबवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.




