गुन्हा नोंद होऊ नये म्हणून हवालदाराने २० हजारांची मागिलती लाच ; गुन्हा दाखल

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
रावेर (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील निंभोरा येथील पोलीस हवालदाराने तक्रारदाराला गुन्हा नोंद होऊ नये म्हणून २० हजारांची लाचेची मागणी केली. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. सुरेश पवार असे गुन्हा दाखल झालेल्या हवालदाराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांकडून १ लाख २७ हजार रुपये किमतीचा केळीचा माल घेऊन तो दिल्ली येथील व्यापाऱ्यांना विकण्यात आला होता. मात्र, त्यांचे पैसे शेतकऱ्यांना न दिल्याने त्यांनी तक्रारदाराविरुद्ध अर्ज दाखल केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी करण्यासाठी हवालदार सुरेश पवार यांनी तक्रारदारांना निंभोरा पोलीस स्टेशन येथे बोलावले होते.
तक्रारदारांनी दिनांक ७ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पंचासमक्ष करण्यात आलेल्या पडताळणीत, हवालदार पवार यांनी तक्रारदाराविरुद्ध गुन्हा नोंद न करण्यासाठी तक्रार अर्जात नमूद रकमेच्या १० टक्के म्हणजेच २० हजार रुपये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. तसेच ही रक्कम संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना द्यावी लागेल, असेही त्यांनी सांगितले होते. तपासानंतर हवालदार सुरेश पवार यांच्या विरोधात लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगावचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोहे.कॉ. किशोर महाजन, महिला पो.हे.कॉ. संगिता पवार, पो. कॉ. राकेश दुसाने,अमोल सुर्यवंशी,भूषण पाटील यांनी कारवाई केली.




