
४०० कामगारांची मोफत आरोग्य तपासणी
जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णांसाठी तसेच सुप्रीम इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन बजरंग तापडिया यांच्या ९२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुप्रीम फ्रेंड्स ग्रुप, गाडेगाव, जळगाव आणि सुप्रीम कंपनी व्यवस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने २२२ कामगारांनी रक्तदान केले. तसेच दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
रक्तदान शिबिरात कंपनीतील २२२ कामगारांनी स्वेच्छेने रक्तदान करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. तसेच जीएमसीतर्फे ४०० कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात कामगारांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचारही करण्यात आला. वयाची ९२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धनाचा संदेश देत कंपनी परिसरात ९२ वृक्षांची लागवड करण्यात आली.
यासोबतच, दिवसभर विविध गरजूंना मदत करणारे उपक्रम राबवण्यात आले. अनाथांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले, तर शासकीय रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना चहा, बिस्किट आणि अन्नदान करण्यात आले. तसेच, गो शाळेत गोसेवा करून सामाजिक कार्याला हातभार लावला गेला. दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि अन्नदान करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस आणि चित्रकला स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते, तसेच विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख डॉ. दीपक शेजवळ, डॉ. कविता गीते, डॉ.श्रुती उमाळे, डॉ. श्रद्धा गायगोळ, जनसंपर्क अधिकारी प्रदीप पाडवी यांच्यासह सुप्रीम व्यवस्थापन (गाडेगाव, जळगाव युनिट), कर्मचारी, कंत्राटदार, कामगार बंधू, सुरक्षा विभाग तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्त पेढी आणि चामुंडा माता होमिओपॅथी कॉलेज, जळगाव यांनी मोलाचे सहकार्य केले.




