मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी जैन स्पोर्टस अकॅडमीच्या नीरज जोशी ची महाराष्ट्र संघात निवड

जळगाव (प्रतिनिधी) : जैन स्पोर्ट्स अकॅडमी चा तसेच जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू नीरज चंद्रशेखर जोशी याची आज मुश्ताक अली टी- 20 क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. त्याच्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी कौतूक केले आहे. जळगावातील बालाजी पेठ मधील रहिवाशी असलेला निरज जोशी अष्टपैलू खेळाडू आहे. डावखुरा गोलंदाज व आघाडीचा फलंदाज असलेला निरज जोशी मागील वर्षी महाराष्ट्राच्या १९वर्षाखालील संघाचा कर्णधार होता, तर यावर्षी २३ वर्षाखालील मुलांच्या संघाचा उप कर्णधारसुद्धा आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आजच त्याला या स्पर्धेसाठी बोलवण्यात आले असून तो मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोलकाता येथे रवाना झाला आहे. त्याच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सीलचे सदस्य तथा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे व पदाधिकाऱ्यांनी कौतूक केले. त्यांच्यासह जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षिक सुयश बूरकुल, मुस्ताक अली तन्वीर अहमद व सर्वांनी त्याचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे.
‘क्रिकेट स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना आपले प्रदर्शन करता यावे, यासाठी अनुभूती निवासी स्कूलमध्ये त्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याचा पुरेपूर फायदा निरज जोशीने उचलला. त्याचे फलित म्हणजे महाराष्ट्र टी-20 संघात त्याची झालेली निवड होय. निरज कडे आम्ही लहानपणापासूनच हरहुन्नरी खेळाडू म्हणून पाहत होतो व त्याने परिश्रमाने, जिद्दीने व चिकाटीने यश संपादन करुन महाराष्ट्र संघात स्थान पटकाविले. ही बाब जळगावकरांसाठी, जैन इरिगेशनसाठी व जिल्हा क्रिकेट असोसिएशनसाठी गौरवास्पद आहे.’
- अतुल जैन, अध्यक्ष, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन




