
एड्सबाबत दिली उपयुक्त माहिती; विध्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन
रावेर (प्रतिनिधी) : मॅक्रो व्हिजन अकॅडमी, रावेर येथे विद्यार्थ्यांसाठी एच.आय. व्ही. एड्स नियंत्रण व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन नामांकित समाजसेवक व आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते विश्वासराव पाटील (ग्रामीण रुग्णालय पाल आय. सी. टी. सी. विभाग दिशा केंद्र) यांनी केले. प्रमुख अतिथी विश्वासराव पाटील यांना शाळेचे सचिव स्वप्नील पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात इयत्ता नववी व दहावी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना विश्वासराव पाटील यांनी स्वतंत्र दोन सत्रात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना एच.आय.व्ही. एड्स या आजाराविषयी सविस्तर माहिती दिली. एड्सपासून बचाव करण्यासाठी स्वच्छता, जागरूकता, योग्य वैद्यकीय सल्ला व सामाजिक समज या घटकांचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. तसेच या आजाराबाबत समाजातील गैरसमज व अफवा दूर करून योग्य माहिती पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शाळेचे सचिव स्वप्निल पाटील, शाळेचे व्यवस्थापक किरण दुबे, शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन धनगर व शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाद्वारे एच.आय.व्ही. एड्सबाबत माहितीपूर्ण मार्गदर्शन घेतले व प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शंका दूर केल्या. अशा प्रकारच्या समाज जागरूक कार्यक्रमांना नेहमीच पाठिंबा आणि शाळेला प्रोत्साहन देण्यासाठी शाळेचे चेअरमन श्रीराम पाटील, सेक्रेटरी स्वप्नील पाटील आणि जॉइंट सेक्रेटरी प्रमोद पाटील, शाळेच्या शैक्षणिक संचालिका वनिता पाटील तसेच शाळेचे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण पासपोहे, खजिनदार विजय गोटीवांले सर्व तत्पर असतात.




