उद्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET)

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ चे आयोजन रविवार, २३ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ३७ जिल्ह्यांत एकूण १४२३ परीक्षा केंद्रांवर होणार आहे. पेपर १ साठी २,०३,३३४ तर पेपर २ साठी २,७२,३३५ असे एकूण ४,७५,६६९ परीक्षार्थी परिक्षेस प्रविष्ट झाले आहेत.
परीक्षा केंद्रांवर सुरक्षेची अत्यंत काटेकोर व्यवस्था ठेवण्यात आली असून पेपर १ साठी ५७१ आणि पेपर २ साठी ८५२ केंद्रांवर CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उमेदवारांचे HHMD द्वारे फ्रिस्किंग, बायोमेट्रिक तपासणी आणि फेस रिकग्निशन करूनच प्रवेश दिला जाणार आहे. कोणतीही शंका आढळल्यास तत्काळ फौजदारी कारवाईची तरतूद आहे. Photo View व Connect View या अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे प्रॉक्सी टाळणे, डुप्लिकेट अर्ज ओळखणे आणि परीक्षा केंद्रांशी थेट संपर्क राखणे शक्य होणार आहे. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर राज्य व जिल्हास्तरावरून सतत सनियंत्रण ठेवले केले जाणार आहे.
परिक्षेसंबंधी युट्युब चॅनेल्स, सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे व प्रसार माध्यमाद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या बातम्या अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व http://mahatet.in अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचना व माहितीचे अवलोकन करावे, असे आवाहन परिषदेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.




