
अभी ना जाओ छोडकर अशी रसिकांची भावना!
जळगाव (प्रतिनिधी) : साहिर लुधियानवी हे शब्दांचे सामर्थ्य फार ताकदीने वापरायचे, त्यांच्या गाण्यातील सुंदर जागा, त्यातील खोल शब्दांचे सौंदर्य, अर्थ व भावना यामुळे ते एक प्रतिभाशाली कवी होते असे सुप्रसिद्ध गायिका आणि हिंदी चित्रपट संगीताच्या अभ्यासक डॉ. मृदुला दाढे यांनी प्रतिपादन केले. व. वा. जिल्हा वाचनालयाच्या वतीने गंधे सभागृहात साहिरनामा या कार्यक्रमात बहारदार गीतांचे विवेचन करताना त्या बोलत होत्या. सलग तीन तास रंगलेल्या या मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध झाले.
व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, उपाध्यक्ष ॲड. सुशील अत्रे, कार्याध्यक्ष सी. ए. अनिलकुमार शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. साहिर कवी म्हणून कसे होते? गायक, संगीतकारांनी त्यांना कसे सहकार्य केले हे सांगून एकाच कवीची अनेक रूपे डॉ. दाढे यांनी सांगितले. सलामे हसरत कबूल करना या गीताच्या विवेचनाने प्रारंभ करत साहिर यांची मानसिकता घडण्यात त्यांचा बालपणापासूनचा संघर्ष, मातृप्रेम, असुरक्षित वातावरण याची माहिती दिली.
ताजमहालविषयी साहिर यांची वेगळ्या भूमिकेमुळे तरुणाईला वेड लावणारे त्यांचे काव्य व साहिर यांच्या काव्यातील स्त्री कर्तृत्वशाली आहे असे सप्रमाण विवेचन सादर केले. डॉ. दाढे यांनी मेरे बरबादी के (त्रिशूल), तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही (दिल ही तो है), चलो एक बार फिरसे अजनबी (गुमराह) या गीतांतील एकदम वेगळ्या वळणावर घेऊन जाणाऱ्या शब्दांची माहिती देत सविस्तर वर्णन केले.
गायक निलेश निरगुडकर यांनी कभी कभी मेरे दिल में खयाल आता है, रंग और नूर की बारात किसे पेश करू, ये दुनिया अगर मिल भी जाये यासह विविध गाणे आणि गझल सादर केल्या. रसिकांनी वन्स मोरचा प्रतिसाद त्यांना दिला. अभी ना जाओ छोडकर हे युगलगीत डॉ. दाढे व निलेश निरगुडकर यांनी एकत्रित सादर करून मैफिलीचा समारोप केला. मैफिलीचे उद्घाटन गायक गौरव मेहता यांनी ओ मेरी जोहरा जबी या गाण्याचा मुखडा सर्व उपस्थितांसह गाऊन करण्यात आले. काही चित्रपटातील गीते हे दृकश्राव्य पद्धतीने दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अपर्णा भट – कासार यांनी केले.




