स्वामी प्रि-प्रायमरी समृद्धी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा

रावेर (प्रतिनिधी) : स्वामी प्रि-प्रायमरी समृद्धी इंग्लिश मिडीयम स्कूल, केऱ्हाळा येथे १४ नोव्हेंबर रोजी बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक वर्गातून एक विद्यार्थी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वेशभूषेत धारण करून कार्यक्रमात सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना आणि नेहरूजी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन विभाग प्रमुख जॉन्सी थॉमस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षिकांनी नेहरूजींच्या प्रतिमेचे पूजन करून बालदिनाचे महत्त्व स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू या विषयावर प्रभावी भाषणे व गाणी सादर केली. विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट्सचे वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्गशिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना छोटेखानी भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. बालदिनाचा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंददायी ठरला. संपूर्ण शाळेत दिवसभर उत्साह, आनंदाचे वातावरण पसरले होते.




