डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. शांता दुर्गे यांचे स्त्रीभ्रूणहत्येवर मार्गदर्शन

जळगाव (प्रतिनिधी) : स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध हा केवळ कायद्याचा नव्हे तर सामाजिक संवेदनशीलतेचा विषय आहे. या संदर्भात वैद्यकीय क्षेत्राने समाजात जागृती निर्माण करून आपली जबाबदारी ओळखावी, असे प्रतिपादन कर्नाटक राज्यातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी अमूल्य, सखोल व उत्कृष्ट योगदान देणाऱ्या डॉ. शांता दुर्गे यांनी केले.
डॉ. दुर्गे या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे आयोजित चर्चा सत्रात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी भूषविले. वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. अर्वीकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, डॉ. अरुण चौधरी,विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, रेसिडेंट डॉक्टर्स व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. अर्वीकर यांनी स्वागतपर भाषणातून समाजातील स्त्रीभ्रूणहत्या समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “वैद्यकीय व्यवसाय हा फक्त उपचारापुरता मर्यादित नसून सामाजिक जबाबदारी पार पाडणारा व्यवसाय आहे. या जबाबदारीची जाणीव प्रत्येक वैद्यकीय विद्यार्थ्याला झाली पाहिजे.”
यानंतर डॉ. शांता दुर्गे यांनी आपल्या अनुभवातून अनेक संवेदनशील उदाहरणे देत या समस्येची मुळे स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, “स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी केवळ कायद्याची अंमलबजावणी पुरेशी नाही, तर समाजातील विचारसरणीत बदल आवश्यक आहे. मुलगी जन्माला आली तर ती घराचे सौभाग्य आहे, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे. असे सांगितले ”डॉ. दुर्गे यानी वरील विषयावर दोन पुस्तके लिहिली असून अनेक वैद्यकीय संमेलनात शोधप्रबंध सादर केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेत Orion ओरिआन Godfre गॉडफ्रे फिलिप्स सह अनेक पुरस्कार त्यांना देण्यात आलेली आहेत.
अध्यक्षीय समारोपात माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी डॉ. दुर्गे यांचे कौतुक करत सांगितले की, “स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याच्या चळवळीत डॉ. शांता दुर्गे यांनी घडवलेले कार्य प्रेरणादायी आहे. आमच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समाजासाठी संवेदनशील डॉक्टर म्हणून घडावे.”असे सांगितले.




