उबाठा, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ‘हिंदी’बाबतच्या शासन निर्णयाची होळी

गिरगावात होणाऱ्या महामोर्चात सहभागी व्हा:आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील उबाठा शिवसेना, मनसे व राष्ट्रवादी शरद पवार गटातफे हिंदीबाबतच्या शासन निर्णयाची छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी होळी करण्यात आली.
राज्यात हिंदी भाषेला पहिलीपासून सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात शिवसेना जळगाव महानगर ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. या तिन्ही पक्षांतर्फे हिंदी सक्तीच्या शासन जीआरची होळी करण्यात आली.
राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याचा शासन आदेश काढण्यात आला आहे. या आदेशाला विरोध करीत महाविकास आघाडीतर्फे या जीआरची रविवारी २९ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकांत होळी करण्यात आली. यावेळी शिवसेना जळगाव महानगर ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट हे त्यांच्या त्याच्या पक्ष कार्यलयातून मोर्चा काढत छत्रपती शिवाजी महाराज चौकांत एकत्र आले. यावेळी त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांच्या हातात आमचा विरोध हिंदी सक्तीला, हिंदी भाषेला नाही, अभिमान आहे आम्हाला मराठी भाषिक असल्याचा असे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते.
यावेळी दि. ५ जुलै रोजी गिरगावात होणाऱ्या महामोर्चात मराठी बांधवानी सहभागी व्हावे, असे आवाहन आंदोलकांद्वारे करण्यात आले. या मोर्चात शिवसेना जळगाव महानगर ठाकरे गटाचे नेते गुलाबराव वाघ, महानगराध्यक्ष शरद तायडे, भाऊसाहेब सोनवणे, विजय बांदल, मनीषा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष एजाज अब्दुल गफ़्फ़ार मालिक, युवक अध्यक्ष रिकू चौधरी, गौरव वाणी,आकाश हिवाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.