योगेंद्र छोटूलाल चव्हाण यांची राज्यस्तरीय कबड्डी संघात निवड

पाल, ता. रावेर (प्रतिनिधी) : येथील योगेंद्र छोटूलाल चव्हाण पुण्यात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत खेळणार असून ३ नोव्हेंबर २०२५ ला जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनने नुकताच जाहीर केलेल्या निवड यादीत त्याचा समावेश आहे. स्वामी स्पोर्ट क्लबचा होतकरू खेळाडू आणि स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रावेर येथील विद्यार्थी योगेंद्र छोटूलाल चव्हाण याची दमदार निवड झाली आहे.
योगेंद्र आता ५ ते ९ नोव्हेंबरदरम्यान बोपखेल गाव, पुणे येथे होणाऱ्या ३६ व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत जळगाव जिल्हा कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्वामी स्पोर्ट क्लबमध्ये नियमित सराव करणारा योगेंद्र हा शाळेतही उत्तम कामगिरी करतो. जिल्हा असोसिएशनच्या कसोटी चाचण्यांमध्ये त्याने आपली चपळाई, ताकद आणि रणनीती यांचा उत्कृष्ट वापर करत निवडकर्त्यांची मने जिंकली. ही स्पर्धा राज्यातील टॉप टॅलेंटची निवड चाचणी असल्याने योगेंद्रसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.
जळगाव जिल्हा कबड्डी संघाचे प्रशिक्षक आणि पदाधिकारी तसेच स्वामी एज्युकेशनल ग्रुपचे अध्यक्ष माननीय रविंद्र पवार सर मुख्याध्यापक यांनी योगेंद्रच्या निवडीचे कौतुक करताना सांगितले की, “योगेंद्रसारख्या युवा खेळाडूंच्या मेहनतीमुळे जळगाव कबड्डीला नवे बळ मिळत आहे.तसेच पाल सह परिसरात ही त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.




