फैजपूरचे खंडेराव मंदिर — भक्तांच्या सोयीसुविधांसाठी तब्बल ₹५० लाखांची भरीव तरतूद !

आमदार अमोलभाऊ जावळे यांचा पाठपुरावा ठरला मोलाचा
जळगाव (प्रतिनिधी) : रावेर – यावल परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या फैजपूर येथील खंडेराव मंदिरातील भक्तांच्या सोयीसुविधा आणि परिसरातील रस्त्याच्या विकासासाठी तब्बल ₹५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजुर झाला असून, मंदिर परिसरात आसनव्यवस्था, पिण्याचे पाणी, प्रकाशयोजना, सुशोभीकरण, स्वच्छता आणि भक्तांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत.
आमदार अमोलभाऊ जावळे यांनी फैजपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. धार्मिक स्थळांचे संवर्धन, पायाभूत सुविधा बळकटीकरण आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. या कामांमुळे शहराचा विकास अधिक वेगाने होणार असून नागरिकांना थेट सुविधा मिळणार आहेत.
शहरातील मंजूर झालेल्या इतर प्रमुख कामांमध्ये अभ्यासिका बांधकाम, मुख्य मिरवणूक मार्गाचे डांबरीकरण, विविध भागांतील रस्ते व सामाजिक सभागृहांची बांधकामे यांचा समावेश आहे. या सर्व विकासकामांसह फैजपूर शहरासाठी मोठा निधी उपलब्ध झाला असून, त्याचा सर्वांगीण परिणाम शहराच्या वाढत्या गरजांवर होणार आहे.
फैजपूर शहराच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे सातत्याने प्रयत्नशील आहेत. शहरातील प्रत्येक भागात संतुलित आणि परिणामकारक विकास व्हावा, यासाठी ते स्वतः पुढाकार घेत आहेत. त्यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीमुळे फैजपूर शहराचा चेहरा बदलत असून, नागरिकांमध्ये विश्वास आणि समाधानाची भावना निर्माण झाली आहे.




