महिलेच्या खूनप्रकरणी प्रियकर आरोपीला जन्मठेपेशी शिक्षा!

साडेतीन वर्षांनंतर मिळाला न्याय, लग्नाचा तगादा लावल्यामुळे विहीरीत ढकलले
जळगाव (प्रतिनिधी) : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना महिलेने सतत लग्नाचा तगादा लावल्यामुळे तिचा प्रियकराने साडेतीन वर्षांपूवी विहीरीत ढकलून खून केला होता. या प्रकरणी न्यायालयाने २९ ऑक्टोबर रोजी आरोपी गुलाम इद्रीस गुलाम हुसेन यास दोषी ठरवत जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील धावे पिंप्री शिवारातील नायगाव रोडवर असलेल्या रविंद्र पोहेकर यांच्या शेतातील विहीरीत आरोपी गुलाम इद्रीस गुलाम हुसेन (वय ४५, रा. मोमीनपुरा, वार्ड क. ३०, श्रीकुमार बिल्डींग जवळ, व-हाणपुर, ता. जि. व-हाणपुर) याने मयत महिलेस ढकलून तिचा खून केला. तसेच तिला विहीरीतून वर येवू नये यासाठी विहीरीत पाण्याचे इलेक्ट्रीक मोटार पंपला असलेला पाईप व वायर, विळ्याच्या सहाय्याने कापून विहीरीत टाकून दिले. ही घटना २७ मार्च २०२२ रोजी संध्याकाळी ७.३० वाजेदरम्यान घडली होती.
घटनेची पार्श्वभूमी अशी
आरोपी गुलाम हुसेन याचे मागील दोन वर्षापासून मयत महिलेशी अनैतिक संबंध होते. ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असतांना महिलेने आरोपीकडे वारंवार लग्नाचा आग्रह केल्यामुळे आरोपीस राग येत होता. त्याने महिलेस सैलानी येथे घेवून धाबे पिंप्री नायगाव रोडवरील पोहेकर यांचे शेतीतील विहीरीवर सकाळपासून दुपारपर्यंत दोघे बसून होते. त्यानंतर आरोपीने महिलेस विहीरीत ढकलून दिले. इलेक्ट्रीक मोटारीचे पाईपला व वायरला धरुन विहीरीतून बाहेर येवू नये म्हणून वायर व पाईप कापून तिला विहीरीतील पाण्यात बुडवून जीवे ठार मारले. अशा आशयाची फिर्याद मयत महिलेचा भाउ शे. फरीद शे. मुसा (रा. बडनेर भोलजी, ता. नांदुरा, जि. बुलढाणा) याने मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला दिली. त्यानुसार आरोपीविरुध्द २८ मार्च २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रत्यक्षदर्शीची साक्ष ठरली महत्वाची
या गुन्हयाचे दोषारोप दाखल होवून भुसावळ येथील सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाउ यांचे न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी शे. फरीद शे. मुसा, मयताची बहिण हसीनाबी शेख, सरकारी पंच अब्दुल रफीक अब्दुल मजीद, वैद्यकिय अधिकारी डॉ. अंजली ए. पाटील यांचा समावेश आहे. आरोपी व मयत महिला विहीरीवर प्रत्यक्ष पाहणारा प्रत्यक्षदर्शी सुरज मराठे तसेच दोघांचे सिमकार्ड, त्यांचे सिडीआर, एस.डी.आर. ग्राहक अर्ज, टॉवर लोकेशन व मोबाईल नंबर तपासणी करणारे नोडल ऑफीसर मंदार भुपेंद्र गोडंबे व फान्सीस परेरा यांच्या साक्ष व मंदार भुपेंद्र गोडये व फान्सीस परेरा यांनी दिलेले भारतीय पुरावा कायदा कलम ६५वी अन्वयेचे प्रमाणपत्र आरोपीविरुध्द गुन्हा शाबीत करण्यास अंत्यत महत्वपूर्ण ठरले.
सरकार पक्षातर्फे अॅड. मोहन डी. देशपांडे यांचा प्रभावी युक्तीवाद
या खटल्याचे कामी तत्कालीन पोलिस निरिक्षक मोहिते यांनी महत्वपूर्ण कार्य केले तसेच या गुन्हयाचा तपास पोलिस निरिक्षक प्रदीप कारभारी शेवाळे, पोलिस उपनिरिक्षक राहूल बोरकर यांनी केला. याकामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता मोहन डी. देशपांडे यांचा प्रभावी युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी गुलाम इद्रीस गुलाम हुसेन याने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी महिला लग्नाचा तगादा लावते म्हणून ठार मारले. हा गुन्हा सिध्द झाल्याने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. रू ५०००/- दंड ठोठावण्यात आला. तसेच या खटल्याकामी पैरवी अधिकारी पोलिस शिपाई कांतीला कोळी व पोलिस शिपाई ज्ञानेश्वर चौधरी यांनी मदत केली.




