नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून मदत द्या!

आमदार अमोलभाऊ जावळे यांची कृषी मंत्री यांच्याकडे मागणी
जळगाव (प्रतिनिधी) : गेल्या चार-पाच दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे रावेर विधानसभा मतदारसंघातील कापूस, ज्वारी, मका तसेच इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही भागात पिके पूर्णपणे उध्वस्त झाली असून शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट कोसळले आहे.
या पार्श्वभूमीवर रावेरचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी मुख्यमंत्री मा.ना. देवेन्द्रजी फडणवीस, कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव यांना पत्राद्वारे मागणी केली आहे की, नुकसानग्रस्त क्षेत्रांचा तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार मदत मंजूर करण्यात यावी.
अवकाळी पावसाने मोठ्या मेहनतीने घेतलेल्या खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातील पिकांवर पाणी पडल्याने शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. अनेक ठिकाणी कापसाच्या बोंडांमध्ये पाणी साचल्याने उत्पादनात घट येणार असून, काही ठिकाणी उभ्या पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. आमदार जावळे यांनी या पार्श्वभूमीवर प्रशासनाला तत्काळ पंचनामे सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आवाहन केले आहे.




