
जळगाव (प्रतिनिधी) : भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील १७ वर्षांपासून काव्यरत्नावली चौक येथे आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. मंडळातर्फे रोपांच्या सहाय्याने बल्लाळेश्वर गणपतीची सजीव प्रतीकृती देखावा म्हणून सादर करण्यात आली आहे.
वृक्षसंवर्धनासह पर्यावरणाचा संदेश यातून दिला गेला. अनंत चतुर्दशी निमित्त गणपती विसर्जनाच्या दिवशी शनिवार ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य व एका परिवारास एक रोप याप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. सजीव बल्लाळेश्वर तयार केलेल्या रोपांचे वाटप प्रसाद स्वरूपात नागरिकांना करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या रोपांचा स्वीकार करून पर्यावरण जतन करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.




