ओबीसींना स्वतंत्र मोहीम राबवत जातीचे दाखले मिळावेत

ओबीसी आरक्षणात वाढ व्हावी; ओबीसी जनकल्याण संघाची निवेदनाद्वारे मागणी
फैजपूर (प्रतिनिधी) : ओबीसींना स्वतंत्र मोहीम राबवत जातीचे दाखले मिळावेत आणि ओबीसी आरक्षणात वाढ व्हावी अशी मागणी ओबीसी जनकल्याण संघाचे प्रदेश अध्यक्ष प्रशांत बोरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यासंदर्भात आज फैजपूर येथे उपविभागीय अधिकारी श्री काकडे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, अनेक छोट्या छोट्या ओबीसीतील जातींना अजून जातीचे दाखले मिळाले नसून त्याला हैदराबाद व अन्य ज्या पद्धतीने मोहिमा राबवण्यात आल्या तशाच पद्धतीने ओबीसीच्या छोट्या छोट्या जातींना घरोघरी जातीचे दाखले उपलब्ध करून द्याव्यात. त्यानंतर निवडणुका घेण्यात याव्यात तसेच आगामी लोकसभा विधानसभा विधान परिषदमध्ये ओबीसी मायक्रो ओबीसी कारागीर यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका जिल्हा परिषदमध्ये मायक्रो ओबीसी छोट्या जातींना आरक्षण मिळण्यासाठी आरक्षणांमध्ये वाढ करण्याची तसेच शैक्षणिक सामाजिक आरक्षणामध्ये सुद्धा वाढ करण्याची मागणी प्रशांत बोरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश महाराज ठाकरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.




