आरोग्यअभिवादनऐतिहासिकजळगावताज्या बातम्यानिवडणूकमहाराष्ट्रराष्ट्रीय-राज्यशैक्षणिकसामाजिक

रोटरी महावाचन अभियानात जळगावकरांनी केले १५ हजार मिनिटे वाचन

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा अभियानात सहभाग

जळगाव (प्रतिनिधी) : येथील रोटरी क्लब जळगावतर्फे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनी आयोजित रोटरी महावाचन अभियानात जळगावकरांनी १५ हजार मिनिटे वाचन केले. बुधवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गणपती नगरातील भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम वाचन नगरीत (रोटरी हॉल) या महावाचन अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

नूतन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी अभियानास प्रत्यक्ष भेट देऊन वाचन करीत सहभाग घेतला. या अभिनव उपक्रमाचे त्यांनी कौतुक करून त्याच सातत्य ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली. अभियानाचा मान्यवरांनी वाचन करून शुभारंभ केला. याप्रसंगी रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ.चंद्रशेखर सिकची, प्रेम कोगटा, व.वा.जिल्हा वाचनालयाचे कार्याध्यक्ष सी.ए.अनिलकुमार शाह, गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील सहप्रांतपाल डॉ.अपर्णा भट – कासार, प्रोजेक्ट चेअरमन विजय जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अनिलकुमार शाह यांनी बोलताना वाचन संस्कृतीला चालना देणारा आणि जळगावची ओळख वाचणार गाव अशी करणारा हा उपक्रम आहे. दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन केले. रीडर स्पीक्स अर्थात वाचकांना लेखी व ऑडिओ – व्हिडिओ स्वरूपात प्रतिसाद नोंदवण्याची, अभिप्राय व्यक्त करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. वाचन अभियान सहभाग स्मृती म्हणून अनेकांनी सेल्फी पॉईंट वर फोटो काढले आणि रीडर्स वॉलवर स्वाक्षरी करून आनंद व्यक्त केला. कुटुंब सदस्यांसह सहभागी झालेल्या परिवाराचा वाचक कुटुंब म्हणून फोटो काढण्यात आले. वाचन सभागृहात विविध मान्यवर व्यक्तींचे सुविचार लावण्यात आले होते.

सायंकाळी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट डॉ. राजेश पाटील, लिटरसी कमिटी चेअरमन प्रा. डॉ. शुभदा कुलकर्णी, नॉन मेडिकल कमिटी चेअरमन संदीप शर्मा यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. आगामी वर्षात रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या सर्व रोटरी क्लब मध्ये हा उपक्रम राबविण्याचा मानस डॉ. राजेश पाटील यांनी व्यक्त केला. रोटरीचे ज्येष्ठ सदस्य कवरलाल संघवी, प्रा. राजेंद्र देशमुख, हरिप्रसाद काळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी तर आभार मानद सचिव सुभाष अमळनेरकर यांनी मानले. सूत्रसंचालन संवाद सचिव व प्रोजेक्ट को-चेअरमन पंकज व्यवहारे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button