“वंदे मातरम्” गीताला १५० वर्षे पूर्ण : भाजपतर्फे जळगावात उद्या भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) : “वंदे मातरम्” या राष्ट्रगीताला यंदा १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतभर हा सोहळा साजरा केला जात आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीद्वारे देशभक्तीचा संदेश देत “वंदे मातरम्”च्या गौरवगाथेचा जयघोष संपूर्ण शहरात घुमणार आहे.
ही रॅली आमदार सुरेश (राजूमामा) भोळे आणि महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. भाजपच्या सर्व अग्रणी नेत्यांसह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, नगरसेवक, मंडल अध्यक्ष, कार्यकर्ते आणि युवक यामध्ये उत्साहाने सहभागी होणार आहेत. रॅलीचा उद्देश नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना दृढ करणे आणि “वंदे मातरम्”च्या १५० वर्षांच्या ऐतिहासिक वारशाचे स्मरण करणे हा आहे.
असा आहे मार्क
ही मोटारसायकल रॅली शुक्रवार ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होईल. त्यानंतर रॅली स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, इच्छा देवी चौक, अजिंठा चौक, कालिंका माता मंदिर मार्गे गोदावरी मेडिकल कॉलेज, साकेगाव येथे समारोप पावेल. रॅलीदरम्यान देशभक्तीपर घोषणाबाजी आणि तिरंगा पताका फडकवून नागरिकांना राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात येणार आहे.
या रॅलीचे संयोजन जळगाव महानगर सरचिटणीस आणि वंदे मातरम् कार्यक्रम संयोजक राहुल रमेश वाघ यांनी केले असून, विनोद (शक्ती) महाजन आणि गोपाळ पोपटानी हे सहसंयोजक म्हणून कार्यरत आहेत. तसेच भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश रमेश पाटील यांच्याही मार्गदर्शनाखाली युवकांनी मोठ्या संख्येने सहभागाची तयारी सुरू केली आहे.




